प्रभात वृत्तसेवा पुणे – प्रचाराच्या रणधुमाळीपासून सुरू झालेला महापालिका निवडणुकीचा धुरळा अखेर मतदान यंत्रात बंद झाला आहे. त्यानंतर उद्या (शुक्रवार) ही मतदान यंत्रे उघडली जाणार असून, या धुरळ्याचा गुलाल कोण उधळणार, हे स्पष्ट होणार आहे. महापालिकेचे नवे कारभारी कोण, हे निश्चित होणार आहे. २०१७ मध्ये महापालिकेत विक्रमी नगरसेवक निवडून आणत सत्तेवर बसलेल्या भाजपला खाली खेचण्यासाठी महाविकास आघाडीला बाजूला सारत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या आहेत. गेल्या पंधरा दिवसांत या दोन्ही पक्षांतील आरोप- प्रत्यारोपांनी पुण्यातील राजकीय वातावरण तापवले असून, पुणेकर पुन्हा कमळाला सत्ता देणार, की घडळ्याची टिकटिक महापालिकेत पुन्हा वाजणार, हे या निवडणूक निकालातून स्पष्ट होणार आहे. गेल्या काही दिवसांत दोन्ही राष्ट्रवादीची कमान हातात घेतलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपच्या महापालिकेतील कारभारावर थेट केलेली टीका, तसेच जाहीरनाम्यात थेट पुणेकरांना मेट्रो आणि पीएमपी मोफत देण्याच्या दिलेल्या आश्वासनामुळे भाजपची कोंडी झाली. त्यानंतर थेट राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुण्यात सांगता सभा घेत अजित पवारांना रोखण्यासाठी पुण्याच्या मैदानात उतरावे लागल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे महापालिकेच्या राजकीय पटलावर या कोणता पक्ष कोणाला मात देणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. पुणे महापालिकेत भाजपचे १२० ते १२५ नगरसेवक निवडून येणार असल्याचा दावा केला जात आहे, तर दोन्ही राष्ट्रवादीला ५५ ते ६० जागा मिळण्याची अपेक्षा आहे. शिवसेनेला १७ ते १८ जागा निवडून येण्याचा अंदाज असून, महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढलेल्या शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि मनसेच्या पुण्यात सुमारे १८ ते २० जागा निवडून येतील, असा दावा केला जात आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांचे दावे गृहीत धरल्यास महापालिकेत कोणत्याही पक्षाची एकहाती सत्ता येणार नाही, असे चित्र दिसत असले, तरी प्रत्यक्षात पुणेकरांनी कोणाला पसंती दिली, यावर महापालिकेचे कारभारी ठरणार आहेत. वाढलेल्या मतदारांची भूमिका निर्णायक महापालिकेच्या यापूर्वी झालेल्या निवडणुका २०१७ मध्ये झालेल्या होत्या. त्या वेळी १६२ जागांसाठी सुमारे २५ लाख २९ हजार मतदार होते. मात्र, त्यानंतर जवळपास ९ वर्षांनी होत असलेल्या या निवडणुकीमध्ये जवळपास ९ लाखांनी मतदारांची संख्या वाढलेली आहे.मतदान गत निवडणुकीच्या तुलनेत सुमारे ४० टक्के वाढलेले आहे. क्रॉस व्होटिंग कोणाला भोवणार? राज्यात गेल्या ९ वर्षांत मोठ्या प्रमाणात आघाडी आणि युतीची समीकरणे जुळलेली असून, राष्ट्रवादीत पडलेली फूट, शिवसेनेत पडलेली फूट, ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गट आणि मनसे एकत्र लढणे अशी वेगवेगळी समीकरणे समोर आली आहेत. त्यातच राज्यात भाजप- शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र असले, तरी महापालिकेच्या स्तरावर हे तिन्ही पक्ष स्वतंत्र लढत असल्याने मतदारांमध्येही गोंधळाची स्थिती असल्याने क्रॉस व्होटिंगची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचा फटका नेमका कोणाला बसणार, हे आज स्पष्ट होणार आहे.