प्रभात वृत्तसेवा पुणे – कसबा-विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयांतर्गत २५, २७ आणि २८ या प्रभागांतील १२ पैकी दहा जागा भाजपने काबीज केल्या आहेत. २०१७ च्या निवडणुकीत १२ पैकी ९ जागा भाजपने जिंकल्या होत्या. यंदा यात एकाने वाढ करण्यात भाजपने यश मिळवले आहे. पहिल्यांदाच महापालिका निवडणूक लढवणारे राघवेंद्र उर्फ बाप्पू मानकर यांनी संपूर्ण पुण्यात सर्वाधिक मते मिळवत विजयाचा झेंडा रोवला.प्रभाग २५ हा शनिवार पेठ – म. फुले मंडई, प्रभाग २७ हा नवीपेठ – पर्वतीतील भागाचा समावेश असलेला. यातील सर्वच्या सर्व आठ जागा भाजपने पटकावल्या आहेत. प्रभाग २८ हा जनता वसाहत-हिंगणे खुर्द येथील मतदारांचा असून, तेथे दोनच जागा भाजपला मिळाल्या. दोन जागा राष्ट्रवादी काॅंगेसने हस्तगत केल्या आहेत.प्रभाग २५ च्या मतमोजणीला प्रथम सुरुवात झाली. पहिल्या फेरीपासूनच भाजपच्या उमेदवारांची आघाडी होती. तिसरी फेरी अर्धी झाली असतानाच सव्वाअकरा वाजता ॲड. रूपाली ठोंबरे यांनी मतदान मशिन बदलल्याचा आरोप केला. त्यावरून बराच गदारोळ झाला. त्यामुळे सुमारे दीड वाजेपर्यंत मतमोजणी बंद ठेवली होती. त्यानंतर त्यांच्या शंकांचे निरसन करून पुढील मतमोजणी सुरू झाली.प्रभाग २५ मधील अ गटामधून भाजपच्या स्वप्नाली पंडित या २२ हजार ९८७ मतांनी विजयी झाल्या. त्यांनी मनसेच्या अमृता भोकरे यांचा ११ हजार ५०७ मतांनी पराभव केला. भोकरे यांना ११ हजार ४८० मते पडली. ब गटामध्ये बाप्पू मानकर विजयी झाले असून, त्यांना ३१ हजार ९८१ मते पडली. त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे समीर गायकवाड यांचा तब्बल २६ हजार ४९७ मतांनी पराभव केला. गट क मध्ये स्वरदा बापट या २६ हजार ४८० मतांनी विजयी झाल्या. त्यांनी काॅंग्रेसच्या राधिका कुलकर्णी यांचा २२ हजार ६८१ मतांनी पराभव केला. कुलकर्णी यांना ३७९९ मते पडली. ड गटामध्ये कुणाल टिळक यांनी २४ हजार ७२४ मते मिळवत विजय मिळवला. त्यांनी काॅंग्रेसच्या सुनील खाटपे यांचा १९ हजार ९८१ मतांनी पराभव केला. मात्र त्यांना त्यांच्या आईचे म्हणजे दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे मताधिक्य मोडता आले नाही.प्रभाग २७ मधील गट अ मधून भाजपच्या अमर आवळे यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या धनंजय जाधव यांचा ०२ हजार ४०७ मतांनी पराभव केला. आवळे यांना १३ हजार ४६७ मते पडली तर जाधव यांना ११ हजार ०६० मते पडली. ब गटात भाजपच्या स्मिता वस्ते यांनी विजय खेचून आणला त्यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या दीपाली बारवकर यांचा ५ हजार ४३० मतांनी पराभव केला. वस्ते यांना १८ हजार ६१४ तर बारवकर यांना १३ हजार १८४ मते पडली. क गटामध्ये लता गौड या १४ हजार ७६१ मतांनी विजयी झाल्या. त्यांनी अक्षता लांडगे यांचा ४ हजार ०४० मतांनी पराभव केला. गट ड मध्ये भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी विजय मिळवला. त्यांना १७ हजार ०५३ मते पडली. त्यांच्या विरोधातील राष्ट्रवादी काॅंग्रेसचे उमेदवार अशोक हरणावळ यांना ११ हजार ३९९ मते पडली. घाटे यांनी हरणावळ यांचा ३,६५४ मतांनी पराभव केला.