प्रभात वृत्तसेवा पुणे – पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रभागांमध्ये भाजपने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत एकूण १२ जागांपैकी ९ जागांवर विजय मिळवत भाजपला या बालेकिल्ल्यावर पुन्हा एकदा ‘कमळ’ फुलविण्यात यश आले. याउलट, काँग्रेसला केवळ १ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला २ जागांवर समाधान मानावे लागले, तर मनसे आणि शिवसेनेच्या दोन्ही गटांना आपले खातेही उघडता आले नाही. मतविभाजनाचा भाजपला मोठा फायदा भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत काशेवाडी-डायस प्लॉट (प्रभाग २२), रविवार पेठ-नाना पेठ (प्रभाग २३) आणि कसबा गणपती-कमला नेहरू रुग्णालय (प्रभाग २४) हे तीन प्रभाग येतात. या तिन्ही प्रभागांत भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळाली. मात्र, विरोधी पक्षांमधील मतविभाजनाचा थेट फायदा भाजपच्या उमेदवारांना झाला, ज्यामुळे भाजपची घोडदौड रोखण्यात विरोधक अपयशी ठरले. प्रभाग २२: बागवे दाम्पत्याला धक्का या प्रभागात भाजप आणि काँग्रेसमध्ये अखेरपर्यंत कढवी झुंज पाहावयास मिळाली. शेवटच्या फेरीत बागवे दाम्पत्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. काँग्रेसचे नेते अविनाश बागवे यांना ‘ड’ गटातून भाजपच्या विवेक यादव यांनी अवघ्या ६२ मतांनी पराभूत केले. तसेच, ‘अ’ गटात अविनाश बागवे यांच्या पत्नी इंदिरा बागवे यांचा भाजपच्या मृणाल कांबळे यांनी २३२ मतांनी पराभव केला. काँग्रेससाठी एकमेव आशेचा किरण म्हणजे ‘ब’ गटात रफिक शेख यांनी भाजपच्या संदीप लडकत यांचा पराभव करून विजय मिळवला. ‘क’ गटात भाजपचा अर्चना पाटील यांना कॉंग्रेसच्या दिलशाद जुबेर बाबू कडवी यांनी झुंज दिली. मात्र त्यांच्या पदरी पराभव आला. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस मधील मतविभाजनाचा फायदा भाजपला झाला. प्रभाग २३: राष्ट्रवादीने भाजपला रोखले या प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपची सरशी रोखण्यात यश मिळवले. ‘ड’ गटातून भाजपच्या विशाल धनवडे यांनी मोठा विजय मिळवला, तर शिवसेनेचे शहर प्रमुख संजय मोरे यांना पाचव्या क्रमांकावर जावे लागले. ‘क’ गटात राष्ट्रवादीच्या लक्ष्मी आंदेकर यांनी भाजपच्या ऋतुजा गडाळे यांचा १४१ मतांनी पराभव केला. ‘ब’ गटात राष्ट्रवादीच्या सोनाली आंदेकर यांनी भाजपच्या अनुराधा मंचे आणि शिवसेनेच्या प्रतिभा रवींद्र धंगेकर यांचा पराभव केला. मात्र, ‘अ’ गटात महाविकास आघाडीतील फुटीचा फायदा घेत भाजपच्या पल्लवी जावळे विजयी झाल्या. प्रभाग २४ : गणेश बिडकरांची बाजी या प्रभागात भाजपचे निवडणूक प्रमुख गणेश बिडकर आणि शिवसेनेचे रवींद्र धंगेकर यांचे चिरंजीव प्रणव धंगेकर यांच्यात प्रतिष्ठेची लढत होती. मात्र, पहिल्या फेरीपासूनच भाजपच्या चारही उमेदवारांनी घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम राहिली. येथे भाजपचे गणेश बिडकर, देवेंद्र वडके, उज्ज्वला यादव आणि कल्पना बहिरट यांनी विजय मिळविला. माजी नगरसेविका सुजाता शेट्टी यांना पराभवाचा सामना करावा लागला. बागवेंची पुन्हा मतमोजणीसाठी अर्ज प्रभाग २२ मध्ये बागवे दाम्पत्यास शेवटच्या फेरीत पराभव झाला. पहिल्या पाच फेरीपासून आघाडी होती. मात्र अंतिम फेरीत त्यांचा पराभव झाला. त्यामुळे त्यांनी भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांकडे पुन्हा मतमोजणीसाठी अर्ज दाखल केला. मात्र निवडणूक अधिकाऱ्यांनी पुन्हा मतमोजणीची तरतूद नसल्याचे सांगत निकाल जाहीर केला. त्यामुळे बागवे समर्थकांची निराशा झाली. आंदेकर विजयी, पोलिसांचा बंदोबस्त प्रभागात सर्व निकाल भाजपच्या बाजूने लागत होती. त्यामुळे कार्यालय बाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू होता. त्यातच दोन्ही आंदेकरांनी विजय मिळविल्याने राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उथळून मोठा जल्लोष केला. त्यामुळे कोणतीही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. पोलिसांची संख्या प्रभागात लक्षणीय होती. त्यामुळे हा प्रभाग शेवटच्या निकालापर्यंत चर्चेत राहिला होता.