प्रभात वृत्तसेवा पुणे – शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी हास्यक्लब आणि योगा ही गुरूकिल्ली आहे. या हास्यक्लब आणि योगा ग्रुपची संख्या वाढण्यासाठी प्रभागात ठिकठिकाणी सुसज्ज आणि प्रदूषणविरहीत जागा उपलब्ध करून विरंगुळा केंद्र आणि ज्येष्ठ नागरिक कट्टे उभारणार असल्याचे आश्वासन भाजपचे उमेदवार किरण दगडे, रूपाली पवार, अल्पना वरपे आणि दिलीप वेडेपाटील यांनी हास्यक्लब आणि योगा ग्रुपच्या सदस्यांना दिले. प्रभाग १० मधील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार किरण दगडे पाटील, रुपाली सचिन पवार, अल्पना गणेश वरपे आणि दिलीप वेडेपाटील यांनी भुसारी कॉलनी आणि बावधन परिसरातील हास्यकलब आणि योगा ग्रुपच्या सदस्यांची भेट संवाद साधला. या वेळी नागरिकांनी उमेदवारांनी प्रभागात केलेल्या विकासकामाचे कौतुक करत, भविष्यात स्वच्छ, सुंदर यासह सुदृढ आणि प्रदूषणविरहीत प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी उपाययोजनांची सूचना केली. त्यावर उमेदवारांनी त्याबाबत तात्काळ कार्यवाही करण्यास आम्ही कटिबद्ध असल्याचे सांगितले, तसेच आरोग्य, स्वच्छता, उद्याने, पादचारी मार्ग, ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा आणि महिलांच्या सुरक्षेसाठी केलेल्या ठोस उपाययोजनांची माहिती उमेदवारांनी दिली. त्यानंतर दिवसभराच्या गृहभेटीत नागरिकांशी संवाद साधताना पाणीपुरवठा, वाहतूक, कचरा व्यवस्थापन आणि सार्वजनिक सुविधांबाबत नागरिकांनी आपल्या अपेक्षा मांडल्या. त्यावर उमेदवारांनी तात्काळ उपाययोजना करण्याचे आश्वासन देऊन प्रभागाचा सर्वसमावेशक विकास आणि पारदर्शक कारभारावर भर देण्यात येईल, असा विश्वासही दिला. महिलांनी उमेदवारांना औक्षण करत शुभेच्छा दिल्या.