प्रभात वृत्तसेवा पुणे : महापालिका निवडणुकीसाठी पुण्यात इच्छूक उमेदवारांनी दोन दिवसांत तब्बल ६,४३७ अर्जांची खरेदी केली आहे. या अर्जांमधील पहिला अर्ज आज दाखल झाला. आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष धनंजय बेनकर यांनी बुधवारी अर्ज दाखल केला.४१ प्रभागांतून १६५ जागांसाठी महापालिका निवडणूक होणार आहे. महापालिकेची मुदत मार्च २०२२ मध्ये संपली होती. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांतील ओबीसी आरक्षणासाठीचा प्रश्न न्यायालयात सुरू असल्याने तीन वर्षांपासून निवडणुका रखडल्या होत्या. १५ जानेवारी २०२६ ला निवडणूक होत आहे. अर्ज भरण्याची प्रक्रीया २३ डिसेंबर पासून सुरू झाली असून ३१ डिसेंबर हा शेवटचा दिवस असणार आहे. पहिल्या दोन दिवसांत तब्बल साडेसहा हजार अर्जांची विक्री झाली असून निवडणुकीत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार आहे. अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी ( मंगळवारी) २,८८६ अर्जांची विक्री झाली, तर बुधवारी ३,५५१ अर्जांची विक्री झाली आहे. सर्वाधिक अर्जांची विक्री हडपसर-मुंढवा निवडणूक कार्यालयातून झाली असून, सर्वात कमी विक्री कोंढवा-येवलेवाडी कार्यालयातून झाली.बुधवारी येरवडा-कळस-धानोरी ४००, नगर रोड-वडगाव शेरी ३८१, कोथरूड-बावधन २७२, औंध-बाणेर १६८, शिवाजीनगर-घोले रोड २०६, कै. बा. स. ढोले पाटील रोड २१६, हडपसर-मुंढवा ४२९, वानवडी-रामटेकडी १९२, बिबवेवाडी २००, भवानी पेठ २५८, कसबा-विश्रामबाग वाडा १२४, वारजे-कर्वेनगर १७२, सिंहगड रोड २१३, धनकवडी-सहकारनगर २३२ आणि कोंढवा-येवलेवाडी ८८ असे अर्ज प्राप्त झाले. सिंहगड रोड निवडणूक कार्यालयात एका उमेदवाराने तीन अर्ज दाखल केले असून, त्याबाबतची नमुना-२ सूचना प्रसिद्ध केल्याची माहिती निवडणूक विभाग प्रमुख उपायुक्त प्रसाद काटकर यांनी दिली.