प्रभात वृत्तसेवा पुणे – पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक २९, ३० आणि ३२ मध्ये आज लोकशाहीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. सकाळपासूनच मतदारांच्या रांगा आणि सायंकाळपर्यंत कायम असलेला उत्साह यामुळे या तिन्ही प्रभागांत कोणत्याही अनुचित प्रकाराविना शांततेत मतदान पार पडले. वारजे -कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत तीन प्रभाग येतात. यामध्ये प्रामुख्याने प्रभाग क्रमांक 29 म्हणजे डेक्कन जिमखाना ,हॅपी कॉलनी या परिसराचा समावेश होतो. प्रभाग क्रमंक 30 मध्ये कर्वेनगर- हिंगणे कॉलनी या परिसराचा समावेश होतो, तर प्रभाग क्रमांक 32 मध्ये वारजे- पॉप्युलरनगर या परिसराचा समावेश होतो. यामध्ये एकूण 253 मतदान केंद्रे होती. प्रभाग 29 मध्ये 76 मतदान केंद्र, प्रभाग 30 मध्ये 79 मतदान केंद्र आणि प्रभाग 32 मध्ये 98 मतदान केंद्र होती. प्रभाग क्रमांक 29 मध्ये दुपारी 3.30 वाजेपर्यंत 40.95 टक्के मतदान पार पडले होते. प्रभाग क्रमांक 30 मध्ये 42.17, तर प्रभाग क्रमांक 32 मध्ये 38.20 टक्के मतदान झाले. या प्रभागातील बहुतांश मतदान केंद्रावर सकाळच्या आणि सायंकाळच्या सत्रात मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. किरकोळ घटना वगळता वगळता बहुतांश ठिकाणी शांततेत मतदान पार पडले. सायंकाळच्या सत्रात मतदारांत उत्साह पाहण्यास मिळाला.प्रभाग क्रमांक 29 मध्ये सकाळी साडेसात ते साडेनऊ या काळात 9 टक्के मतदान झाले, तर प्रभाग क्रमांक 30 मध्ये 8 टक्के, प्रभाग क्रमांक 32 मध्ये 7 टक्के मतदान झाले. साडेअकरा वाजेपर्यंत प्रभाग क्रं 29 मध्ये 19 टक्के, प्रभाग क्र.30 मध्ये 18 टक्के आणि प्रभाग क्रमांक 32 मध्ये 16 टक्के इतके मतदान झाले होते. तर दुपारी दिड वाजेपर्यंत प्रभाग क्र्मांक 29मध्ये 31 टक्के, प्रभाग क्रमांक 30 मध्ये 31 टक्के आणि प्रभाग क्रमांक 27 मध्ये 27 टक्के मतदान झाले होते.