प्रभात वृत्तसेवा पुणे – प्रत्यक्ष संवादातून समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यावर आपला भर राहणार असून, प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व घटकांना सोबत घेण्यावर आपला भर राहणार असल्याची ग्वाही प्रभाग क्रमांक २५- ड मधील भाजपचे अधिकृत उमेदवार कुणाल शैलेश टिळक यांनी मतदारांना दिली. टिळक यांनी शनिवारपासून प्रभागात घरोघरी संपर्क अभियान सुरू केले असून, त्याची सुरुवात शुक्रवार पेठेपासून करण्यात आली. या अभियानाअंतर्गत टिळक यांनी शुक्रवार पेठ परिसरात भेट देत स्थानिक रहिवासी आणि व्यावसायिकांशी थेट संवाद साधला. या वेळी नागरिकांकडूनही त्यांचे स्वागत करण्यात आले. या अभियानात अमित कांकर, सागर खरात, सोहम भोसले, अशोक कदम आणि अनिल तेलवडे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या भेटी वेळी नागरिकांनी नागरी सुविधा, स्वच्छता, वाहतूक, तसेच दैनंदिन समस्यांबाबत मांडलेल्या अडचणी टिळक यांनी गांभीर्याने ऐकून घेतल्या. परिसरातील परिस्थितीची सखोल जाण, प्रत्यक्ष संवादातून प्रश्न समजून घेण्याची पद्धत आणि त्यावर उपाययोजना करण्यावर दिला जाणारा भर यामुळे प्रभागातील समस्या सोडविण्यासाठी ते सक्षम नेतृत्व देऊ शकतील, अशा भावनाही उपस्थित नागरिकांनी व्यक्त केल्याचे दिसून आले.