प्रभात वृत्तसेवा पुणे – छत्रपती शिवाजीनगर प्रभाग क्र. १२ (ड) मधील तरुणाईच्या हाताला हक्काचे काम मिळावे यासाठी कौशल्याधिष्ठीत प्रशिक्षणावर माझा विशेष भर असेल. पुणे महापालिकेच्या माध्यमातून उभारल्या जाणाऱ्या ‘स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर सिटी लायब्ररी’मध्ये विशेष कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यासाठी मी कटिबद्ध राहीन, असा विश्वास भारतीय जनता पक्ष-आरपीआय आणि मित्रपक्षाच्या उमेदवार प्राचार्या डॉ. निवेदिता गजानन एकबोटे यांनी व्यक्त केला. प्रभागातील मॉडेल कॉलनी, वीर चाफेकरनगर परिसरात आयोजित प्रचार पदयात्रेत त्या बोलत होत्या. डॉ. एकबोटे यांनी सकाळी हिरवाई उद्यानात नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी स्थानिक नागरिकांनी त्यांचे जंगी स्वागत करीत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.डॉ. एकबोटे म्हणाल्या की, महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करणे आणि बचतगटांना अधिक सक्षम करणे ही माझी प्राथमिकता असेल. त्याचप्रमाणे परिसरातील आरोग्य, स्वच्छता, मुबलक पाणीपुरवठा आणि हरित पट्ट्याची जपणूक करण्यासाठी मी सदैव तत्पर राहीन. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा मानसही त्यांनी यावेळी व्यक्त केला. या प्रचार दौऱ्यात सुजाता शिरोळे, रवींद्र साळेगावकर, गणेश बगाडे, रवीराज यादव, जितेंद्र मंडोरा, गौरव मंडोरा, हेमंत डाबी, किरण ओरसे, प्रकाश शेलार, मनीषा जाधव, स्वाती पटवर्धन, मंगेश नलावडे, संदीप शिरोळे, नीलेश जाधव, तन्मय टिळेकर यांच्यासह पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.