पुणे : शनिवार पेठ, सदाशिव पेठ, मंडई परिसरात अनेक जुनी घरे, तसेच जुने वाडे आहेत. या ठिकाणी पाणीपुरवठ्यासाठी असलेल्या जलवाहिन्यांची संख्या अपुरी असून, सुमारे ३० ते ४० वर्षांपूर्वी ड्रेनेज वाहिन्या टाकलेल्या आहेत. त्यातच मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढल्याने या दोन्ही सुविधांवर ताण येत असून, महापालिकेच्या माध्यमातून जुन्या जलवाहिन्या बदलून पाणीपुरवठा सुरळीत करणे, तसेच ड्रेनेज वाहिन्या बदलण्यास आपले प्राधान्य राहणार असल्याची ग्वाही प्रभाग क्रमांक २५ ड शनिवार पेठ- महात्मा फुले मंडईमधील भाजपचे अधिकृत उमेदवार कुणाल टिळक यांनी दिली. टिळक यांच्या प्रचारार्थ सदाशिव पेठ परिसरात पदयात्रा काढण्यात आली. या वेळी त्यांनी मतदारांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या वेळी वाडे, तसेच जुन्या घरांमधील नागरिकांकडून पाणीपुरवठा. तसेच ड्रेनेजच्या समस्या मांडल्या. त्या सोडविण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून वेगाने काम होण्याची अपेक्षा व्यक्त केली. काही ठिकाणी सांडपाण्याच्या लाइनमध्ये अडथळे येत असल्याने दुर्गंधी आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होत असल्याचेही निदर्शनास आणून दिले. त्यानंतर टिळक यांनी समस्यांची नोंद घेत, महापालिकेच्या माध्यमातून या कामास आपले प्राधान्य राहणार असल्याची खात्री मतदारांनी दिली. महापालिकेच्या संबंधित विभागांशी समन्वय साधून उपाययोजना करू, असे त्यांनी सांगितले. पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.