प्रभात वृत्तसेवा पुणे : अगामी महापालिका निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष महाविकास आघाडी सोबतच लढणार आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसंदर्भात जिल्हा अध्यक्ष व विभागातील विद्यमान लोकप्रतिनिधींनी, खासदार, आमदार यांनी पुढाकार घेऊन महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांशी चर्चा करावी, असे आदेश प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिले आहेत. त्यामुळे, पुण्यासह राज्यातील महापालिकांच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या चर्चेला गती येणार आहे. याबाबतचे पत्रच शिंदे यांनी काढले असून त्यानुसार पुण्यात लवकरच बैठका होणार असल्याची माहिती शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली.शिंदे यांनी काढलेल्या आदेशानुसार, या निवडणूका महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच लढविण्याचे मूलभूत धोरण आहे. त्यानुसार सर्वपक्षीय वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीमध्ये यापूर्वीच चर्चा झाली आहे. मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, नाशिक महापालिका क्षेत्रफळाच्या व प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनक्षम असल्याने त्यांच्यासहीत सर्व शहर जिल्हाध्यक्षांनी जागा वाटप, उमेदवार निवडीबाबत आपल्या पक्षाच्या नेत्यांबरोबर चर्चा करून सुस्पष्ट अहवाल सादर करावा. तसेच आपल्या पक्षातील इतर पदाधिकारी किंवा नेत्यांबाबत काही मत असेल तर त्यांनी जिल्हाध्यक्ष, लोकप्रतिनिधींशी चर्चा करावी असेही स्पष्ट केले आहे. निवडणूक काळात महाविकास आघाडीबाबत समाजमाध्यमांवर जबाबदारीने आणि संयमाने बोलण्याची जबाबदारी फक्त जिल्हाध्यक्ष, लोकप्रतिनिधींची आहे, असेही आदेशात म्हटले आहे. मनसेबाबत संभ्रम राज्यात मनसे महाविकास आघाडीत सामील होणार की नाही याबाबत अद्यापही संभ्रमाची स्थिती आहे. मुंबईत महाविकास आघाडीत मनसेला घेण्यास काॅग्रेसचा विरोध आहे. मनसेचे स्थानिक पदाधिकारी महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढण्यास सकारात्मक आहेत. त्यामुळे, राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा सुरू करण्यास एक पाऊल पुढे टाकले असले तरी चर्चेत मनसे असणार का याबाबत संभ्रमाची स्थिती आहे. मनसेनेही अद्याप याबाबत काहीच भूमिका स्पष्ट केलेली नाही. महायुतीबाबत तिढाच ? एकीकडे महाविकास आघाडीच्या बैठकांची चर्चा सुरू होत असताना दुसरीकडे पुण्यात भाजपच्या कोअर कमिटीने महायुती म्हणून लढण्यास शहर भाजपने सकारात्मकता दाखविली आहे. मात्र, त्यानंतरही शिवसेना तसेच रिपाईसोबत आघाडी होणार की, नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. रिपाईच्या शहर कार्यकारिणीच्या बैठकीत भाजपसोबत महायुती म्हणून लढण्याचा ठराव करण्यात आला आहे. पक्षाला भाजपकडून किमान २० जागा मिळतील, अशी अपेक्षा आहे. शिवसेनाही युतीसाठी आग्रही असून त्यांचीही ३५ ते ४० जागांची मागणी आहे. मात्र, भाजपने आधीच १२० जागा जिंकण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षासोबत युती झाल्यास जागा वाटपाचा तिढा असणार आहे.