प्रभात वृत्तसेवा पुणे – केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पदयात्रेला नवी पेठमध्ये मोठा प्रतिसाद मिळाला. तरुणाई मोठ्या संख्येने या पदयात्रेत सहभागी झाली होती. या प्रभागातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार धीरज घाटे, महेश ऊर्फ अमर आवळे, स्मिता वस्ते, लता गौडा पदयात्रेत मुरलीअण्णांसोबत सहभागी झाले होते.नवी पेठेतील लोकमान्यनगर परिसरातील दत्त मंदिरापासून पदयात्रेला सुरुवात झाली आणि यशवंतनगरमध्ये समारोप झाला. या भागातील सर्व अंतर्गत रस्त्यांमधून पदयात्रा गेली. यावेळी परिसरातील लोकांनी पदयात्रेचे स्वागत केले. अनेक ठिकाणी पदयात्रेवर पुष्पवृष्टी करण्यात आली. भाजपच्या पॅनलने या प्रभागात मोठी आघाडी घेतली आहे. यशवंतनगरमध्ये झालेल्या कोपरा सभेत पक्षाच्या चारही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन मुरलीधर मोहोळ यांनी केले. यावेळी त्यांनी पुण्यात विकास करण्यासाठी भाजपचीच गरज असल्याचे सांगितले. पदयात्रेमध्ये महिलांचा सहभागही लक्षणीय होता. हातात कमळाचे पोस्टर्स घेतलेल्या महिला कार्यकर्त्या नागरिकांना भाजपला मतदान करण्याचे आवाहन करीत होत्या.