प्रभात वृत्तसेवा पुणे – स्वच्छ, सुंदर आणि विकसित कसबा मोहिमेला बळ म्हणून आमदार हेमंत रासने यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग २५ शनिवार पेठ महात्मा फुले मंडई भागात सुरू असलेले ‘मिशन स्वच्छ प्रभाग २५’ निवडणूक प्रचाराच्या धामधुमीतही अविरतपणे सुरू असल्याची माहिती राघवेंद्र ऊर्फ बाप्पू मानकर यांनी दिली.प्रभागातील स्वच्छतेविषयक गरज लक्षात घेऊन या मिशनचा बाप्पू मानकर यांनी प्रचाराच्या धामधुमीतही नियमित आढावा घेतला. नागरिकांकडून प्राप्त होत असलेल्या अस्वच्छतेविषयक तक्रारी, त्यांचे निराकरण, लागणारा वेळ याबाबत त्यांनी माहिती घेतली. याशिवाय स्वच्छता सेवकांच्या आरोग्याची विचारपूस केली. निवडणुकीची घोषणा झाल्यावरही निवडणूक आयोगाच्या नियमांच्या अधीन राहून हे अभियान सुरू ठेवण्यात आले आहे. “निवडणुकीच्या धामधुमीच्या काळात हे अभियान बंद होईल, असे वाटले होते. मात्र, आमच्या शनिवार पेठ भागात आज पाचव्या वेळेस ‘मिशन स्वच्छ प्रभाग २५’ टीम स्वच्छता करत आहे. यासारखे अभियान नियमितपणे राबवले जाईल, अशी ग्वाही आम्हाला मानकर यांनी दिली आहे.” – जयेश पंडित, नागरिक “मिशन स्वच्छ प्रभागच्या २५ माध्यमातून अनेक रस्ते आणि अरुंद गल्ल्या स्वच्छ केल्या आहेत. सुरुवातीला कचऱ्याची विल्हेवाट लागावी, यासाठी डस्ट बिनचे वाटप करण्यात आले. आजपर्यंत ८० टन कचरा उचलण्यात आला आहे.” – राघवेंद्र (बाप्पू) मानकर