प्रभात वृत्तसेवा पुणे – सोसायट्यांच्या पुनर्विकासातून कोथरूड बदल असताना येथील नागरिकांना सर्व सोयीसुविधा मिळाव्यात, यासाठी नियोजनबद्ध विकासाचा आराखडा तयार केला आहे. विशेषत: वीज, पाणी, ड्रेनेज व पावसाळी लाइन, सुसज्ज व स्वच्छ रस्ते, पदपथ या मूलभूत सुविधेसह बावधन-भुसारी काॅलनी पुणे शहरातील एक विकासाचे रोल माॅडेल ठरेल, असा विश्वास प्रभाग १० मधील भाजपच्या उमेदवारांनी नागरिकांना दिला. भाजपचे अधिकृत उमेदवार किरण दगडे- पाटील, रुपाली सचिन पवार, अल्पना गणेश वरपे आणि दिलीप वेडेपाटील यांनी विविध सोसायट्यांना भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधला. या वेळी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मागील पाच वर्षांत उमेदवारांनी केलेल्या कामांचे कौतुक केले. यावेळी सकाळी पंडित भीमसेन जोशी उद्यान आणि सावरकर ग्राउंडवर नागरिकांची भेट घेऊन संवाद साधला. ज्येष्ठ नागरिक, हास्य क्लबमधील सदस्य आणि कमिन्स कंपनीतील कर्मचाऱ्यांची भेट आणि म्हातोबा मंदिर येथे महिला मेळावा पार पडला.