प्रभात वृत्तसेवा पुणे : महापालिका निवडणुकीसाठी काॅग्रेसने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू केल्या आहेत. मुलाखतींसाठी सकाळपासून काॅग्रेसच्या भवनच्या आवारात इच्छुकांनी मोठी गर्दी केल्याने काॅग्रेस भवन गजबजलेले होते.काँग्रेस पक्षाने १२ डिसेंपासून अर्ज मागविले होते. त्यात सुमारे ६०० हून अधिक कार्यकर्त्यांनी अर्ज घेतले आहेत. त्यातील ४०० इच्छुकांनी शुल्कासह अर्ज पक्षाकडे सादर केलेले आहेत. त्यातील २८० इच्छुकांच्या आज मुलाखती घेण्यात आल्या अर्जांची संख्या जास्त असल्याने इच्छुकांची मुलाखत स्वतंत्र न घेता प्रत्येक प्रभागाच्या इच्छुकांना एकत्र बोलवत मुलाखती घेण्यात आल्या. त्यात प्रत्येकाला नावासह का इच्छुक आहात ? काय कामे केली ? जनसंपर्क कसा आहे असे प्रश्न विचारण्यात आले. बुधवारी दिवसभरात प्रभाग १ ते २० च्या मुलाखती घेण्यात आल्या असून उद्या ( गुरूवारी) प्रभाग २१ ते ४१ च्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. त्यानंतर त्याचा अहवाल राज्याच्या निवड समितीकडे पाठविला जाणार आहे. शहराध्यक्ष अरविंद शिंदे, ज्येष्ठ नेते अॅड. अभय छाजेड, माजी आमदार रमेश बागवे, मोहन जोशी, दिप्ती चवधरी, माजी महापौर कमल व्यवहारे,तसेच संबधित ठिकाणचे ब्लॉक अध्यक्ष मुलाखतींसाठी उपस्थित होते.