प्रभात वृत्तसेवा पुणे : आगामी महापालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी इच्छुकांची नावे मागविली आहेत. त्यानंतर हे अर्ज जवळपास आठवडभर स्विकारले जाणार असून त्यानंतर इच्छुकांच्या प्रभागनिहाय मुलाखती घेतल्या जाणार आहेत.मात्र, येत्या तीन ते चार दिवसांतच आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे, अनेक राजकीय पक्षांचे अर्ज स्विकारणे आणि मुलाखतींचे नियोजन कोलमडण्याची शक्यता आहे. त्यामुळे बहुतांश पक्षांना आता अर्जांवरूनच विना मुलाखत उमेदवार जाहीर करावे लागणार आहे.गेल्या तीन वर्षांपासून महापालिकेच्या रखडलेल्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पूर्वी घेण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आहेत. त्यानुसार, निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी आवश्यक असलेली प्रभाग रचना, आरक्षण अंतीम करण्यात आले असून मतदानकेंद्र निहाय मतदारयाद्या जाहीर करण्याचे काम अंतीम टप्प्यात आहे. अशातच प्रशासकीय पातळीवर महत्वाची विकासकामे, निविदा तसेच कार्यादेश देण्याची कामे १५ डिसेंबरपूर्वी पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. निवडणुकांचे संभाव्य वेळापत्रक लक्षात ठेऊन राज्य सरकारने हिवाळी अधिवेशनाचा कालावधीही आठ दिवसांवर आणला असून यावेळी शनिवार- रविवारीही अधिवेशनाचे कामकाज सुरू ठेवले आहे. त्यामुळे १५ डिसेंबर नंतर कोणत्याही दिवशी निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता प्रशासकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.पुण्यातही या संभाव्य तारखा लक्षात घेवून भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काॅग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, मनसे, रिपाईने इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. मात्र, भाजप वगळता उर्वरीत सर्वच पक्षांनी १५ डिसेंबरनंतरच अर्जांची छाननी करून त्यानंतर मुलाखती घेवुन इच्छुकांची नावे पुढे कळविली जाणार आहे. मात्र, याच वेळी आचारसंहिता लागल्यास राजकीय पक्षांना मर्यादा येणार आहेत. तसेच तत्काळ अर्ज भरणे, जाहीरनामा, प्रचाराचे नियोजन, उमेदवार याद्या अंतीम करणे यावर लक्ष द्यावे लागणार आहेत. परिणामी अनेक पक्षांना मुलाखतीशिवाय उमेदवारांची यादी जाहीर करावी लागण्याची चिन्हे आहेत.