प्रभात वृत्तसेवा पुणे – एकीकडे राजकीय पक्षांतील अटीतटीची लढत, तर दुसरीकडे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना व्यक्तींच्या कुटुंबीयांत दिलेली उमेदवारी यामुळे पुणे महापालिकेची निवडणूक चर्चेची ठरली. आज (शुक्रवारी) मतदान प्रक्रिया मात्र शांततेत पार पडल्याने प्रशासकीय यंत्रणांनी सुटकेचा निःश्वास सोडला. काही ठिकाणच्या किरकोळ वादावादीच्या घटना वगळता कोठेही गालबोट लागले नाही. मतदानाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून बुधवारी रात्रीपासूनच बंदोबस्ताची चोख आखणी केली होती, तर संवेदनशील इमारतीतील मतदान केंद्रांवर विशेष बंदोबस्त तैनात केला होता. गुन्हेगारीचा धाक असलेल्या परिसरात विशेष खबरदारी घेतली होती. शीघ्र कृतिदल, एसआरपीएफ, होमगार्ड, गुन्हे शाखेची पथके असा तब्बल १२ हजार पोलिसांचा फौजफाटा पोलिसांकडून तैनात करण्यात आला होता. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त पंकज देशमुख, मनोज पाटील, राजेश बनसाेडे, संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताची आखणी करण्यात आली होती. मतदान सुरू असताना शहरातील सर्व घडमोडींचा आढावा वरिष्ठ पोलीस अधिकारी घेत होते. अनुचित घटना किंवा प्रकार घडल्यास तेथे त्वरित पोलीस पोहोचतील, अशा पद्धतीने बंदोबस्ताची आखणी करण्यात आली होती. शिवाजीनगर येथील मुख्यालयात राखीव मनुष्यबळ ठेवण्यात आले होते. मतदान प्रक्रियेत अडथळा, तसेच गैरप्रकार करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला होता. त्रिस्तरीय बंदोबस्त शहरासह उपनगरांतील ९० संवेदनशील मतदान केंद्रावर पोलिसांकडून अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला होता. अनुचित घटना रोखण्यासाठी शीघ्र कृतिदल (क्विक रिस्पाॅन्स टीम), तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर विशेष पथक (स्ट्रायकिंग फोर्स) गस्त घालत होते. मतदान केंद्रापासून शंभर मीटर अंतरावर मतदार वगळता कोणालाही प्रवेश दिला जात नव्हता. पोलिसांकडून मतदान केंद्राच्या आतील, मतदान केंद्राच्या बाहेर आणि शंभर मीटर परिसर असा त्रिस्तरीय बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. साध्या वेशात गस्त गुरुवारी पुणे शहर, उपनगरांत तीन हजार ९८३ मतदान केंद्रांवर ही मतदान प्रक्रिया पार पडली. येथील बंदोबस्त ठेवताना प्रत्येक केंद्रावर एक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आला होता. शहरातील ९१३ इमारतींत हे मतदान झाले. अशा प्रत्येक इमारतीवर दोन पोलीस कर्मचारी तैनात केले होते. प्रत्येक मतदान केंद्राच्या परिसरात वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलीस निरीक्षकांची गस्त होती. मोठा फौजफाटा मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी पोलिसांनी अगोदरच तीन हजार ४३९ प्रतिबंधात्मक कारवाया केल्या होत्या. शहरात १४ पोलीस उपायुक्त, ३० सहायक पोलीस आयुक्त, १६६ पोलीस निरीक्षक, ७२३ सहायक पोलीस निरीक्षक, तसेच साडेबारा हजार पोलीस कर्मचारी असा बंदोबस्त तैनात होता.