प्रभात वृत्तसेवा पुणे – केंद्र व राज्यात, महापालिकेत भाजपची सत्ता असताना पुण्यासाठी पुरेसा निधी मिळालाच नाही. पुण्याचा सर्वांगीण विकास होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात मात्र तसे झालेच नाही. स्मार्ट सिटी योजना, २४/७ पाणीपुरवठा योजना आणि बीआरटी योजना गुंडाळल्याची टीका काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केली. काँग्रेस भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहराध्यक्ष गजानन थरकुडे, काँग्रेसचे शहर वरिष्ठ उपाध्यक्ष अजित दरेकर, सरचिटणीस प्राची दुधाने आदी उपस्थित होते.भाजपने सत्तेत असताना शहराचा अपेक्षित विकास केला नाही. काँग्रेसच्या काळातील योजनाच पुढे नेऊन केवळ त्यांची नावे बदलण्याचे काम केले. दिवंगत खासदार सुरेश कलमाडी यांनी मेट्रोची संकल्पना पुढे आणली होती. पुण्याच्या भौगोलिक विस्ताराचा विचार करता २०० किमी मेट्रो अपेक्षित होती. प्रत्यक्षात मात्र ती केवळ ३२ किमीपर्यंतच मर्यादित राहिली आहे, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले. पुणेकरांमध्ये बदलाची अपेक्षा निर्माण झाली असून, आगामी निवडणुकीत त्याचा प्रत्यय येईल, असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला. शहरातील टेकड्या फोडणे आणि नदीपात्र सुधारण्याच्या नावाखाली नदीपात्रात भर टाकून ते अरुंद केले जात आहेत. पुण्याला पुराचा धोका निर्माण झाला आहे. भाजप मतविभाजनासाठी इतर पक्षांतील कार्यकर्ते व नेते फोडत असल्याचा आरोप गजानन थरकुडे यांनी या वेळी केला.