प्रभात वृत्तसेवा पुणे – महापालिकेच्या निवडणुकीमध्ये बंडखोरांची मनधरणी करण्यासाठी कॉंंग्रेस पक्षाकडून जोरदार हालचाली सुरू असून बैठकांचा धडकाच लावण्यात आला आहे. बंडखोरी रोखण्यात कॉंंग्रेसला यश मिळणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.कॉंंग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांची आघाडी झालेली आहे. आघाडी झालेली असतानाही दोन्ही पक्षांकडून काही प्रभागात अर्ज दाखल करण्यात आले. या कॉंंग्रेसकडून ९० उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, अन्य काही उमेदवारांनीही अर्ज दाखल करून ठेवले आहेत. शिवसेनेला जागा वाटप करण्यात आलेल्या प्रभागात कॉंंग्रेसच्या उमेदवारांनीही अर्ज दाखल केले आहेत. बंडखोरांची मनधरणी करण्यासाठी दोन्ही पक्षाच्या बैठकाचे सत्र गुरुवारी दिवसभर सुरूच होते. बंडखोरांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांची समजूत काढण्यासाठी प्रयत्न केले गेले. आघाडीतील जागा वाटपानुसार त्या-त्या पक्षांचे उमेदवारी अर्ज कायम रहावेत. बंडखोरांना आवर घालता यावा याअनुषंगाने चर्चाही झाली. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी शुक्रवारी (दि.२) सकाळी ११ ते दुपारी ३ अशी अंतिम मुदत देण्यात आली आहे. अद्याप बंडखोरांची मनधरणी करण्यासाठी कॉंंग्रेसला पुरेसे यश मिळालेले नाही. चर्चेचे सत्र शुक्रवारी सकाळीही सुरूच राहण्याची अधिक शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.