प्रभात वृत्तसेवा पुणे – महापालिका निवडणुकीसाठी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने इच्छुकांना अर्ज भरण्यासाठी दोन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आता पक्षाकडून येत्या मंगळवारपर्यंत (दि.१६) अर्ज स्विकारले जाणार आहेत. पक्षाकडून या पूर्वी १४ डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे. आतापर्यंत पक्षाकडून ७०० इच्छुकांनी अर्ज घेतले असून ५६३ अर्ज जमा करण्यात आले आहेत. तर, अनेक इच्छुकांनी मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे. त्यानुसार पक्षाकडून वाढीव मुदतीत उमेदवारांनी आपले अर्ज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालय, काँग्रेस भवन येथे सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत जमा करावेत, असे आवाहन शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केले आहे. शहरातील विविध प्रभागांतून काँग्रेसकडून उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या वाढत असून, स्थानिक पातळीवर पक्ष संघटन अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने ही प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे. उमेदवारी अर्ज प्रक्रियेला मिळालेला प्रतिसाद हा आगामी महापालिका निवडणुकीत काँग्रेस सक्रिय आणि आक्रमकपणे तयारी करत असल्याचे या वरून स्पष्ट होत असल्याचे शिंदे यांनी सांगितले.