प्रभात वृत्तसेवा पुणे – प्रभाग रचना, बदललेली मदतान केंद्रे आणि उमेदवारी निवडीवरून सर्वच राजकीय पक्षांमध्ये उडालेल्या गोंधळामुळे आपला नेमका उमेदवार कोण, याबाबत मतदारांमध्ये असलेला संभ्रम आणि बोगस मतदान केंद्राच्या परिसरात भेटवस्तू आणि पैसे वाटण्याच्या आरोपांवरून मतदान केंद्राच्या परिसरात झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर महापालिका निवडणुकांचे मतदान गुरुवारी पार पडले. मात्र, शहरात जवळपास ३० ते ४० हून अधिक असे घडलेले प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झालेले असताना महापालिका प्रशासनाकडे मात्र एकही तक्रार प्राप्त झालेली नाही. पोलिसांकडेही याबाबत कोणतीही तक्रार दाखल नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मतदान केंद्राच्या आत प्रचार महापालिका मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात कोणतीही वाहने पार्किंग करणे अथवा उमेदवारांनी प्रचार करण्यास मनाई असते. मात्र, शहरात अनेक प्रभागांत सरसकट उमेदवार मतदान केंद्राच्या आवारातच प्रचार करण्यासह वोटर स्लिपचे वाटप करताना आढळले. या वेळी अनेक ठिकाणी पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली, तर काही ठिकाणी हटकण्याचा प्रयत्न केला असताना उमेदवारांनी पोलिसांशी हुज्जत घातल्याचे दिसून आले. मात्र, पोलिसांकडून कडक भूमिका न घेतल्याने दिवसभर नगर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील प्रभागात हे चित्र दिसून आले. बाहेरगावावरून आणले मतदार शहरात प्रभाग क्रमांक ४१ आणि प्रभाग क्रमांक ९ मध्ये बाहेरगावावरून आलेल्या मतदारांवरून राडा झाल्याचे दिसून आले. प्रभाग ४१ मध्ये बार्शीमधून आलेल्या काही मतदारांकडे उमेदवारांकडून ओळखपत्राची मागणी करण्यात आली. मात्र, त्यांना काहीच उत्तर देता आले नाही. त्या वेळी काही काळ या भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रभाग क्रमांक ९ मध्येही कोकणातील काही जिल्ह्यांतून मतदारांची गाडी असल्याचे निदर्शनास आल्याने काही राजकीय पक्षांच्या कार्यर्त्यांनी या मतदारांना हटकले. त्यावरून झालेल्या गोंधळाच्या वेळी या मतदारांना घेऊन आलेल्या गाडीची तोडफोड करण्यात आल्याचे दिसून आले. पैशांचा महापूर महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांचा या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदारांना पैशांचे, तसेच साहित्याचे वाटप झाल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे शहरातील वस्ती भाग असलेल्या पाटील इस्टेट, जनता वसाहत, दांडेकर पूल, भवानी पेठ, काशेवाडी, डायसप्लाॅट, येरवडा, मंगळवार पेठ, ताडीवाला रस्ता या भागांत मोठ्या प्रमाणात पैसे -वाटप झाल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे अनेक कार्यकर्ते मतदारांना बुथवरून घेऊन येण्यापूर्वी पैसे देऊन आणताना दिसत होते. दुसरीकडे अनेक ठिकाणी स्वत: मतदारच उमेदवारांच्या कार्यालयांमध्ये जात थेट पैशांची मागणी करत असल्याने उमेदवारही आवक झाल्याचे पाहायला मिळाले, तर काही ठिकाणी मतदारांना घेऊन येण्यासाठी रिक्षांमधून आणून पुन्हा घरी सोडताना पैशांची पाकिटे दिली जात होती. विशेष म्हणजे या निवडणुकीत नव्याने समाविष्ट गावांमध्येही पैशांचे बेसुमार वाटप झाले. त्यात सोसायट्यांचाही समावेश असल्याचे दिसून आले. या गावांमधे एका मताला तीन ते पाच हजारांपर्यंत पैसे वाटल्याची चर्चा आहे. त्यात, लोहगाव, वाघोली, धायरी, नऱ्हे, सूस, खराडी, मांजरी, येवलेवाडी, आंबेगाव या परिसरात सर्वाधिक पैशांचे वाटप झाल्याची चर्चा मतदारांमध्ये आहे.