प्रभात वृत्तसेवा पुणे – प्रभाग क्रमांक २४ मधून भाजपाचे उमेदवार गणेश बिडकर यांच्या प्रचारार्थ आयोजित ‘विजय संकल्प महापदयात्रा’ मोठ्या उत्साहात पार पडली. कसबा गणपती मंदिरापासून सोमवार पेठेतील गाडगे महाराज मठापर्यंत काढण्यात आलेल्या या पदयात्रेत कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. निवडणूक जाहीर झाल्यानंतर प्रभागात आयोजित करण्यात आलेली ही पहिलीच मोठी पदयात्रा ठरली. वाहतुकीवर परिणाम होऊ नये, यासाठी प्रचारकाळात पदयात्रा टाळण्याचा निर्णय बिडकर यांनी घेतला होता. मात्र, राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त ही पदयात्रा काढण्यात आली. उज्ज्वला यादव, देवेंद्र वडके आणि कल्पना बहिरट हे प्रभागातील अन्य उमेदवारही ‘विजय संकल्प महापदयात्रे’त सहभागी झाले होते. तांबट आळी, जनार्दन पवळे संघ, त्वष्टा कासार मंदिर, क्रांतिवीर मंडळ, थोरले बाजीराव मंडळ, गुंडाचा गणपती, व्यवहार आळी, आढाव गल्ली आणि कसबा मेट्रो स्टेशन या मार्गाने पदयात्रा सोमवार पेठेत दाखल झाली. कमला नेहरू रुग्णालयासह संपूर्ण प्रभागात ही पदयात्रा काढण्यात आली.भाजपचे पुणे शहर निवडणूक प्रमुख गणेश बिडकर यांनी सांगितले, की पदयात्रेत दिसून आलेला कार्यकर्त्यांचा उत्साह आणि नागरिकांचा सहभाग पक्षासाठी सकारात्मक संकेत आहे. या प्रभागासह पुणे शहरातही भाजपला चांगले यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.