प्रभात वृत्तसेवा पुणे – पुणे महापालिका निवडणुकीत भाजप शिवसेनेला आजही केवळ १६ जागाच देण्यास तयार आहे. मात्र, शिवसेनेकडून १०० हून अधिक उमेदवारांना एबी फाॅर्म दिले असून, छाननीअंती जवळपास ८० जणांचे उमेदवारी अर्ज वैध झाले. त्यामुळे युतीचा फाॅर्म्युला ठरला आणि वाट्याला २० जागा आल्या, तरी राहिलेल्या ६० उमेदवारांना अर्ज माघारी घेण्यास सांगताना शिवसैनिकांचा रोष कोण ओढवून घेणार ? याची धाकधूक नेत्यांमध्ये आहे, तर दुसरीकडे युती होऊ नये, उमेदवारी लढण्याची संधी मिळावी, यासाठी एबी फाॅर्म मिळालेल्या उमेदवारांनी देव पाण्यात ठेवले.भाजप- शिवसेना युतीतील जागावाटपाची बैठक गुरुवारी (दि. १) संध्याकाळी होणार होती. मात्र, ती बैठक झाली नसून, शुक्रवारी (दि. २) सकाळी बैठक होणार असल्याचे अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यानंतर युतीचा निर्णय आणि जागा वाटपाचा फाॅर्म्युला ठरेल. मात्र, मागील दोन दिवसांतील वरिष्ठ नेत्यांच्या हालचाली आणि पुण्यातील पदाधिकाऱ्यांच्या चर्चेतून युती होणार नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, पुणे महापालिकेतील निवडणुकीत शिवसेनेने उमेदवारांना दिलेल्या एबी फार्मची संख्या आणि भाजपकडून मिळणाऱ्या जागांच्या संख्येचे गणित कुठेच जुळत नाही आणि जुळणारही नाही असे दिसते. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले असून, युती झाली आणि जागांचा फाॅर्म्युला ठरल्यावर शिवसेनेच्या अनेक उमेदवारांना अर्ज माघारी घ्यावे लागणार आहे. त्यामुळे राग, संताप, गोंधळ या सर्व गोष्टींना पक्षाच्या नेत्यांना सामोरे जावून शिवसैनिकांची समजूत काढावी लागणार आहे. एवढे करूनही उमेदवारी मागे घेतली नाही, तर संबधित उमेदवाराचा एबी फाॅर्म रद्द करण्यात यावा, असे पत्र निवडणूक कार्यालयाकडे जावू शकते.