प्रभात वृत्तसेवा पुणे – आगामी पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या रणधुमाळीत छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक १२ (शिवाजीनगर-मॉडेल कॉलनी) मध्ये भारतीय जनता पक्षाने विजयाचा निर्धार केला आहे. या प्रभागातील भाजपच्या चारही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि कार्यकर्त्यांनी ‘विजय संकल्प’ केला. निवडणुकीच्या नियोजनासाठी शिवाजीनगर गावठाण येथील श्री रोकडोबा मंगल कार्यालय येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीला आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची प्रमुख उपस्थिती होती. आगामी निवडणुकीची रणनीती, संघटनात्मक बांधणी आणि प्रत्येक बूथ स्तरावर मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यासाठी या बैठकीत सखोल चर्चा झाली. कार्यकर्त्यांचा उत्साह आणि संघटनेची एकजूट हीच विजयाची गुरुकिल्ली असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. प्रभाग १२ मधील भाजपच्या अधिकृत उमेदवार प्राचार्या डॉ. निवेदिता एकबोटे, अपूर्व खाडे, पूजा जागडे आणि अमृता म्हेत्रे यांना मतदार मोठ्या मताधिक्याने विजयी करतील, असा विश्वास डॉ. निवेदिता एकबोटे यांनी व्यक्त केला. या बैठकीस माजी नगरसेविका डॉ. ज्योत्स्ना एकबोटे, निलिमा खाडे, स्वाती लोखंडे, शहर सरचिटणीस रवींद्र साळेगावकर, मतदारसंघ अध्यक्ष शैलेश बडदे, गणेश बगाडे, किरण ओरसे, हेमंत डाबी, कल्पेश मोरे, हर्षनील शेळके यांसह भाजपचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीमुळे प्रभागातील राजकीय वातावरण तापले असून भाजपने प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.