PMC Election: पुणे महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक आठ बोपोडी परिसरात भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराला मोठी गती मिळत आहे. भाजपचे अधिकृत उमेदवार भक्ती अजित गायकवाड, सपना आनंद छाजेड, सनी निम्हण आणि परशुराम वाडेकर यांच्या प्रचारार्थ आज खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पदयात्रेद्वारे परिसरातील नागरिकांशी संवाद साधला. या पदयात्रेला औंध आणि बोपोडी भागातील नागरिकांनी प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ठिकठिकाणी नागरिकांनी उमेदवारांचे स्वागत करत भाजपच्या विकासकामांबाबत विश्वास व्यक्त केला. मोहोळ यांनी स्थानिक प्रश्न जाणून घेत, केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू असलेल्या योजनांची माहिती नागरिकांना दिली. सुशिक्षित आणि कार्यक्षम नेतृत्वाला महापालिकेत पाठविण्याचा निर्धार यावेळी त्यांनी व्यक्त केला. यावेळी मुरलीधर मोहोळ यांच्यासमवेत शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे उपस्थित होते. त्यांनीही पदयात्रेत सहभागी होत नागरिकांशी संवाद साधला आणि भाजपच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सोसायटीमधील रहिवासी मोठ्या संख्येने या पदयात्रेत सहभागी झाले होते. औंध-बोपोडी परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप कटिबद्ध असून, नागरिकांच्या सहभागातून हा प्रचारसंवाद अधिक प्रभावी ठरत असल्याचे चित्र आजच्या पदयात्रेतून स्पष्टपणे दिसून आले.