प्रभात वृत्तसेवा पुणे – रविवारची पर्वणी साधत प्रभाग क्रमांक २३ मधील भाजपच्या उमेदवारांनी प्रचारफेरी काढत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. या प्रचारफेरीत मोठ्या प्रमाणात स्थानिक नागरिक, पक्षाचे कार्यकत्यांनी सहभाग घेत पक्षाचे अधिकृत उमेदवार ॠतुजा तेजस गडाळे, अनुराधा मंचे, पल्लवी जावळे, तसेच विशाल धनावडे यांना बहुमताने निवडून देण्याचा निर्धार जाहीर केला.या प्रचार फेरीत महिलांची संख्या लक्षणीय होती. प्रभागात गडाळे यांच्यासह सर्वच उमेदवारांना चांगला प्रतिसाद मिळत असून, या पदायात्रेने त्यावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा परिसरात आहे. नाना पेठ- कामगार मैदान, तसेच परिसरात ही पदयात्रा काढण्यात आली. त्यात महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला, तर पदयात्रा पोहोचलेल्या भागात नागरिकांकडून उमेदवारांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. या वेळी हजारो कार्यकर्त्यांनी भाजप, तसेच उमेदवारांच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला. त्यामुळे प्रभागात भाजपमय वातावरण झाल्याचे पाहायला मिळाले. या वेळी मतदारांनी उमेदवारांशी संवाद साधत प्रभागासाठी आवश्यक असलेल्या कामांच्या सूचनाही उमेदवारांना दिल्या. भाजपकडून गडाळे या तरुण युवतीला दिलेल्या उमेदवारीचे स्वागत करत त्या सक्षमपणे आपली जबाबदारी पार पडतील, असा विश्वासही व्यक्त करत त्यांचे कौतुक केले. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आपले प्राधान्य राहणार असून, मतदारांचा विश्वास सार्थ ठरविणार असल्याची ग्वाही या वेळी गडाळे यांनी मतदारांना दिली.