प्रभात वृत्तसेवा पुणे – प्रभाग क्रमांक १ मधील भाजपचे अधिकृत उमेदवार अनिल ( बाॅबी) वसंतराव टिंगरे यांच्या प्रचाराची सांगता त्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धानोरी येथील आनंद पार्क परिसरात मोठ्या उत्साहात झाली. या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांनी टिंगरे यांचे उत्साहात, तसेच भावनिक वातावरणात स्वागत केले. महापालिकेच्या माध्यमातून प्रभाग, तसेच या परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू असलेली कामे पूर्णत्वास घेऊन जाण्यासाठी पुन्हा एकदा महापालिकेत संधी देण्याचे आश्वासन मतदारांनी या वेळी अनिल (बाॅबी) वसंतराव टिंगरे यांना दिल्याचे पाहायला मिळाले. या वेळी काही नागरिकांनी हा परिसर बॉबी दादांचा बालेकिल्ला आहे, असे अभिमानाने सांगत दादांवरील आपला विश्वास पुन्हा एकदा व्यक्त केला.गेल्या अनेक वर्षांत आनंद पार्क आणि आसपासच्या भागात केलेल्या विकासकामांमुळे, नागरिकांचे दादांशी भावनिक नाते अधिक घट्ट झाल्याचे या वेळी दिसून आले. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, सुरक्षा आणि परिसराचा सर्वांगीण विकास या विषयांवर नागरिकांशी संवाद साधत पुढील काळात आणखी भरीव कामे करण्याचा निर्धार अनिल (बाॅबी) वसंतराव टिंगरे यांनी व्यक्त केला. त्यानंतर प्रचाराची सांगता झाली. या वेळी टिंगरे यांनी प्रचारासाठी पहिल्या दिवसापासून सोबत असलेल्या कार्यकर्त्यांचेही आभार मानले.