पुणे : लक्ष्मी रस्त्यावर वर्षभर खरेदीसाठी राज्यभरातील ग्राहकांची वर्दळ असते. या वेळी सततच्या वाहतूक कोंडीमुळे या भागातील व्यावसायिक, तसेच स्थानिक नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेच्या माध्यमातून स्ट्रीट मॅनेजमेंट, तसेच पार्किंगसाठी स्वतंत्र नियोजन करण्यावर आपला भर राहणार असल्याची ग्वाही प्रभाग २५ शनिवारवाडा- महात्मा फुले मंडई मधील भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार कुणाल शैलेश टिळक यांनी दिली. महापालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ लक्ष्मी रोड परिसरात घरोघरी संपर्क अभियान राबवत त्यांनी नागरिकांशी थेट संवाद साधला. व्यापारी आणि रहिवासी भागातील दैनंदिन नागरी प्रश्न जाणून घेतले. या भेटीदरम्यान टिळक यांनी दुकानदार, कर्मचारी, तसेच स्थानिक नागरिकांशी चर्चा केली. गर्दी व्यवस्थापन, पादचारी मार्गांची अडचण, स्वच्छता, तसेच मूलभूत नागरी सुविधांबाबत नागरिकांनी आपले अनुभव मांडले. टिळक यांनी नागरिकांच्या सूचनांची नोंद घेत, व्यापारी भागातील प्रश्न सोडविण्यासाठी विशेष नियोजनाची आवश्यकता असल्याचे नमूद केले. महापालिकेच्या माध्यमातून या समस्यांबाबत प्रशासन, व्यावसायिक, नागरिक अशा सर्व घटकांशी समन्वय साधून उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. पक्षाचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.