प्रभात वृत्तसेवा पुणे : पुण्यात भाजपने १२० नगरसेवक निवडून आणण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. त्यासाठी पक्षाला महापालिकेच्या निवडणुकीत १६५ मधील किमान १४२ ते १४५ जागा लढविण्याची आवश्यकता आहे. त्यावरून भाजप आणि शिवसेनेत जागा वाटपाचा तिढा निर्माण झाला आहे. भाजपने शिवसेनेला केवळ १० ते १५ जागा देण्याची तयारी दर्शविली असल्याने शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी असून भाजपच्या या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी गुरूवारी बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिवसेनेकडून शहरात ३५ जागांची मागणी केली असून त्या जागांसह उमेदवारांच्या नावांचा प्रस्तावही शिवसेनेचे वरिष्ठ नेते आणि भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे, शिवसेनेच्या जागा कमी केल्या तरी किमान २५ जागा तरी मिळाव्यात अशी शिवसेनेला अपेक्षा आहे. पक्षाकडून पुण्यातील जागा वाटपासंदर्भात आमदार डाॅ. निलम गोऱ्हे, आमदार विजय शिवतारे, शहर संपर्क प्रमुख अजय भोसले हे भाजप सोबत जागांची चर्चा करत आहेत. नाहीत मैत्रीपूर्ण लढत ? भाजप आणि शिवसेना महापालिकेत एकत्र लढणार आहेत. दोन्ही पक्षांकडून याबाबतची घोषणा करण्यात आली आहे. त्यानंतर जागा वाटपाची चर्चा सुरू झाली. सुरूवातीला भाजपकडून शिवसेनेला केवळ ८ ते ९ जागाच देण्याची तयारी दर्शविण्यात आली. त्यानंतर शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत अशा प्रकारे पक्षाला कमी जागा मिळणार असतील तर सामूहिक राजीनामे देण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर पुन्हा मंगळवारच्या बैठकीत भाजपने हा आकडा १५ पर्यंत आणला असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. मात्र, ही संख्याही कमी असल्याने शिवसेनेचे पदाधिकारी नाराज असून जागा वाटपात सन्मानजनक जागा मिळाल्या नाही तर मैत्रीपूर्ण लढत करण्याची पक्षाची तयारी असल्याचेही सांगण्यात येत आहे. संभाव्य जागा वाटप सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपकडून १४० जागा लढवल्या जातील. शिवसेनेला १८ जागा देण्यात येतील. रिपईला मागील निवडणुकीत सात जागा देण्यात आल्या होत्या. त्या जागा कायम ठेवल्या जातील. अथवा रिपईच्या दोन जागा कमी करून त्या जागा शिवसेनेला देत शिवसेनेला पुण्यात २० जागा दिल्या जातील. रिपई २०१७ मध्ये भाजपच्याच तिकिटावर लढलेली असल्याने यावेळी ते कमळावर लढणार आहेत. त्यामुळे, शिवसेनेला आणखी दोन जागा वाढवून द्यायच्या झाल्यास त्या रिपईच्या कोटयातून कमी केल्या जातील असे सांगण्यात येत आहे.