प्रभात वृत्तसेवा पुणे – प्रभाग २५ हा बहुतांश पेठांचा भाग असल्याने येथे जुन्या वाड्यांचा प्रश्न गंभीर आहे. त्यांचा पुनर्विकास होणे आवश्यक आहे. या पुनर्विकासात बऱ्याच अडचणी येतात त्या सोडवण्यासाठी ‘रिडेव्हलपमेंट फोरम’ची स्थापना करणार असल्याची ग्वाही या प्रभागातील भाजपचे उमेदवार राघवेंद्र (बाप्पू) मानकर यांनी दिली. प्रभाग २५ (शनिवार पेठ–महात्मा फुले मंडई) परिसरात प्रचारार्थ नागरिकांशी संवाद फेरीदरम्यान त्यांनी ही माहिती दिली. अनेक वर्षे जुने असलेले हे वाडे मोडकळीला आले आहेत. तरीही तेथे जीव मुठीत घेऊन नागरिक राहतात. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना या कामांसाठी वारंवार चकरा माराव्या लागतात. पुनर्विकासासाठी लागणारा कायदेशीर सल्ला, आवश्यक कागदपत्रे तसेच त्यासंबंधी मार्गदर्शन देण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात येणार असल्याचे मानकर यांनी सांगितले. तसेच, सोसायट्यांच्या मानीव अभिहस्तांतरण (डिम्ड कन्व्हेन्स) प्रक्रियेसाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या उपक्रमाचा अनेक ज्येष्ठ नागरिकांसह सर्वसामान्य नागरिकांना मोठा लाभ होणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.प्रभाग २५ मधून राघवेंद्र (बाप्पू) मानकर, स्वरदा बापट, कुणाल टिळक आणि स्वप्नाली पंडित हे निवडणूक लढवत आहेत. रविवारी आमदार हेमंत रासने यांच्यासह महात्मा फुले मंडईतील व्यापाऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधण्यात आला. तसेच, रविवारचा सुटीचा दिवस असल्याने शनिवार पेठ, नारायण पेठ आणि बुधवार पेठ परिसरात पदयात्राही काढण्यात आली.