प्रभात वृत्तसेवा पुणे – शहराच्या पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी ठोस, दीर्घकालीन उपाययोजना राबविण्याचा निर्धार प्रभाग क्रमांक १२ (ड) च्या भाजप-आरपीआय व मित्रपक्षाच्या उमेदवार प्राचार्या डॉ. निवेदिता एकबोटे यांनी व्यक्त केला आहे.डॉ. एकबोटे यांनी शनिवारी वडारवाडी, मॉडेल कॉलनी, प्रभात रोड आणि डेक्कन जिमखाना परिसरात पदयात्रा काढून नागरिकांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी नद्यांचे पुनरुज्जीवन, सांडपाणी व्यवस्थापन, प्लॅस्टिकमुक्ती आणि डोंगर-टेकड्यांवरील वृक्षारोपणाला प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले. वडारवाडीच्या विकासासाठी त्यांनी स्मार्ट मॉडेल संकल्पना मांडली. या मॉडेलच्या माध्यमातून पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन आणि सार्वजनिक आरोग्य आदी मूलभूत सेवा तंत्रज्ञानाच्या मदतीने एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. महापालिकेच्या २०२४-२५ च्या पर्यावरण अहवालात कार्बन उत्सर्जनात झालेली दुपटीने वाढ ही चिंतेची बाब असून, यावर मात करण्यासाठी हरित, स्वच्छ आणि शाश्वत पुणे हे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून काम करणार असल्याचे डॉ. एकबोटे यांनी सांगितले.स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेताना त्यांनी सौर ऊर्जेसारख्या अपारंपरिक ऊर्जेचा वापर वाढवण्यावर भर दिला. तक्रार निवारणासाठी डिजिटल प्रणालीचा वापर करून प्रशासकीय पारदर्शकता आणण्याचा त्यांचा संकल्प आहे. पदयात्रेत माजी नगरसेवक मिलिंद एकबोटे, डॉ. नंदकिशोर एकबोटे, पंकज उणेचा, संतोष जगताप,आयेशा कुरेशी, सीमा उत्तेकर, सोनी पवार, राम म्हेत्रे यांच्यासह मित्र पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. नागरिकांनीही पदयात्रेचे ठिकठिकाणी उत्साहात स्वागत केले.