प्रभात वृत्तसेवा पुणे : महापालिका निवडणुकीसाठी तब्बल ३० हजार कर्मचाऱ्यांनी टपाली मतपत्रिकांची मागणी नोंदविली आहे. त्यामुळे यंदा पुण्यात सर्वाधिक टपाली मतदान होणार आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी या कर्मचाऱ्यांची निवडणूक कर्मचारी म्हणून नेमणूक झाली आहे. त्यानुसार, प्रशासनाने तयारी करण्याच्या सूचना पालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिल्या. आयुक्तांनी निवडणूक तयारीचा आढावा घेतला. प्रशासनाने निवडणुकीसाठी केलेल्या तयारीची माहितीही आयुक्तांनी घेतली. अतिरिक्त महापालिका आयुक्त(विशेष) ओमप्रकाश दिवटे , उपायुक्त निवडणूक प्रसाद काटकर यावेळी उपस्थित होते. निवडणूक कामकाजासाठी पालिकेने २४ समंन्वय अधिकारी नेमले असून त्यांनी निवडणूक तयारीचे सादरीकरण केले. ९ हजार ईव्हीएम पालिका निवडणुकीसाठी ९००० ईव्हीएम उपलब्ध झाले असून उर्वरित मशीन आयोगाच्या निर्देशानुसार प्राप्त होतील. सर्व ईव्हीएम वाहतूक वाहनांना जीपीएस यंत्रणा लावलेली असून पोलीस बंदोबस्तामध्ये वाहतूक करण्यात येत आहे. तसेच स्ट्रॉंग रूम अद्ययावत असून त्या ठिकाणी सीसीटीव्हीही कार्यान्वित केलेले आहेत. तसेच, याचे प्रशिक्षणही कर्मचाऱ्यांना देण्यास सुरूवात केली आहे. वाहतूक व्यवस्थापन अंतर्गत आवश्यक अधिकारी व कर्मचाऱ्यांना १०५१ वाहने उपलब्ध केली आहेत. तसेच वाहतूक आराखडा नकाशासह तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. आचारसंहिता भंग राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आचारसंहितेची कार्यवाही सुरू असून त्यासाठी २४ तास पथके कार्यरत आहेत. या कक्षाकडे आचारसंहिता भंगाचा पहिला गुन्हा दाखल झाला आहे. सुमारे ८ हजार बोर्ड फ्लेक्स, बॅनर्स काढले आहेत. आतापर्यंत कक्षाकडे ५ तक्रारी आल्या असून त्यावर वेळेत कारवाई केल्याचे स्पष्ट करण्य़ात आले. मतदानासाठी आवश्यक सर्व साहित्य छपाई करण्याची कार्यवाही सुरू असून ४०११ मतदान केंद्राकरिता ६५०० साहित्याचे किट तयार करण्याची कार्यवाही सुरू आहे.