प्रभात वृत्तसेवा पुणे : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपसोबत युती करायची की स्वतंत्र लढत द्यायची, यावरून शिंदे शिवसेनेतच स्पष्ट दोन गट निर्माण झाले आहेत. शहराध्यक्ष नाना भानगिरे हे युतीच्या बाजूने ठाम भूमिका घेत असताना, महानगर प्रमुख रविंद्र धंगेकर यांनी अधिक जागांची मागणी करत स्वतंत्र लढतीची तयारी दर्शविली आहे. या परस्पर विरोधी भूमिकांमुळे शहर शिवसेनेत संघटनात्मक संभ्रम निर्माण झाला आहे.विशेष म्हणजे शिवसेनेला शहरात युतीत कोणत्या आणि किती जागा हव्या आहेत, याचा सविस्तर अहवाल भानगिरे यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे पाठविला आहे. असे असताना आता पक्षाकडून शहरातील सर्व जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यामुळे, पक्षाचे कार्यकर्ते संभ्रमात असून या वादाचा फटका पक्षाला बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.राज्यातील रखडलेल्या महापालिकांच्या निवडणुका लवकरच म्हणजे पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. महायुती होणार की नाही, याबाबत अद्याप अधिकृत निर्णय झाला नसला तरी भाजप आणि शिवसेनेच्या वरिष्ठ पातळीवर युतीबाबत चर्चा सुरू असल्याचे सांगितले जाते. त्याच अनुषंगाने पुण्यातील संभाव्य युतीसाठी शिवसेनेकडून जिंकण्याजोग्या जागांची यादी मागविण्यात आली होती. शहर शिवसेनेकडून सुमारे ३० ते ३५ जागांची प्राथमिक यादी वरिष्ठ नेत्यांकडे पाठविण्यात आली असून, त्याच्या आधारे भाजपकडे जागावाटपाबाबत बोलणी करण्याची तयारी सुरू आहे. याच वेळी महानगर प्रमुख धंगेकर यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे चर्चांना वेगळे वळण मिळाले आहे. भाजप केवळ मर्यादित जागा देणार असेल, तर ते स्वीकारले जाणार नाही. तसेच गरज भासल्यास सर्व जागांवर शिवसेना निवडणूक लढविण्यास सज्ज असल्याचे त्यांनी जाहीरपणे सांगितले.दुसरीकडे, शहरातील सध्याची राजकीय ताकद आणि मागील निवडणुकांतील अनुभव लक्षात घेता भाजपसोबत युती केल्यास शिवसेनेला लाभ होऊ शकतो, असा मतप्रवाह पक्षातील एका गटात आहे. त्यामुळे भानगिरे यांची युतीस अनुकूल भूमिका अधिक व्यवहार्य असल्याचे समर्थकांचे म्हणणे आहे. मात्र, धंगेकर यांनी अधिक जागांचा आग्रह धरल्यास युतीची शक्यता कमीच असल्याचे बोलले जात आहे.