प्रभात वृत्तसेवा पुणे – अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे बुधवारी निवडणूक कर्मचाऱ्यांना ‘ओव्हरनाइट’ ड्युटी करावी लागली. या कर्मचाऱ्यांना अर्ज तपासणीसाठी सकाळी सात पर्यंत थांबावे लागले. एकूण अर्ज भरण्याच्या मुदतीत ३०४१ अर्ज दाखल झाले असून, त्यातील २३०० अर्ज हे केवळ शेवटच्या दिवशी म्हणजे ३० डिसेंबर रोजी दाखल झाले आहेत. अर्ज भरण्याची मुदत २३ ते ३० डिसेंबर पर्यंत होती. २८ डिसेंबरपर्यंत कोणत्याही पक्षाचे उमेदवारी देण्याचे चित्र स्पष्ट नव्हते. पक्षप्रवेश, इच्छुकांची पळवापळवीच सुरू होती. २९ तारखेला उमेदवारांना पक्षांनी यादी जाहीर न करता थेट एबी फाॅर्म द्यायला सुरुवात केली. त्यामुळे अधिकच गोंधळ निर्माण झाला. इच्छुक चातकाप्रमाणे एबी फाॅर्मची वाट पाहात होते. आपापल्या प्रभागात जर पक्षाने अन्य कोणाला तिकीट दिल्याचे दिसल्यानंतर त्या इच्छुकांनी अन्य पक्षांत उडी मारून एबी फाॅर्मही मिळवला.त्यामुळे २९ डिसेंबरलालगबग करून उमेदवारांनी त्या दिवशीच अर्ज दाखल केला. मात्र, ज्यांना शेवटच्या दिवशी म्हणजे, १२ वाजेपर्यंत एबी फाॅर्म मिळाला, त्यांनी मात्र आपापल्या नेमून दिलेल्या क्षेत्रीय कार्यालयात तुडुंब गर्दी केली. दुपारे तीन वाजेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत होती. उमेदवारांना अर्ज दाखल करण्यासाठी टोकन देण्यात आले होते. त्यामुळे या उमेदवारांचे अर्ज दाखल करून घेण्याची प्रक्रिया रात्रीपर्यंत सुरू होती. अनेक उमेदवारांनी रात्री ११-१२ पर्यंत अर्ज दाखल केले.सादर झालेले अर्ज तपासण्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात एकच टेबल ठेवण्यात आले होते, तसेच तीन ठिकाणी अर्ज तपासले जात होते. त्यामुळे या प्रक्रियेला सकाळच उजाडली. या निवडणूक कर्मचाऱ्यांनी संपूर्ण रात्रभर हे काम केले आणि हे काम सकाळी सात वाजेपर्यंत सुरू होते. बुधवारीच अर्जांची छाननी होणार होती. त्यामुळे त्यांना अर्ज तपासणीचे काम सकाळी संपवणे आवश्यक होते.