प्रभात वृत्तसेवा पुणे : महापालिका निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर बुधवारी दिवसभर सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी क्राॅस व्होटिंगचा धसका घेतल्याचे पहायला मिळाले. दहा दिवस प्रचारात गेल्यानंतर उमेदवारीपासून दूर राहिलेले इच्छुक, प्रचारातून गायब असलेले नाराज कार्यकर्ते आणि मतदारांचा अंदाज घेवून अनेकांनी अखेरच्या क्षणी नगरसेवकपद पदरात पाडून घेण्यासाठी क्राॅस व्होटिंगची खेळी सुरू केली आहे. परिणामी, नव्याने निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची चांगलीच कोंडी झाली आहे. त्यातच पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारीही याबाबत काहीच स्पष्ट बोलत नसल्याने उमेदवारांमध्ये अस्वस्थता पसरली असल्याचे दिसून आले.भाजपसह, दोन्ही राष्ट्रवादी काॅग्रेस, शिवसेना, स्वतंत्र लढत आहेत. महाविकास आघाडी म्हणून काॅग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि मनसे एकत्र मैदानात आहेत. अशा स्थितीत गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि राष्ट्रवादीने शहरात एकमेकांच्या विरोधात जोरदार प्रचार केला आहे. त्यामुळे, या दोन्ही पक्षातच मुख्य लढत होणार आहे. त्यातच, भाजपातील नाराजांना राष्ट्रवादीने तिकिट दिल्याने तसेच अनेक प्रभागात भाजप तसेच राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक एकाच प्रभागात लढत असल्याने त्यांच्याकडून एकमेकांना मदत करण्यासाठी साकडे घातले जात असल्याची जोरदार चर्चा आहे. प्रामुख्याने उपनगरांमध्ये तसेच शहरातील मध्यवर्ती भागातील काही प्रभागांमध्ये उमेदवारांकडून पक्षाच्या नेत्यांना अंधारात ठेवत तसेच आपल्या सोबतच्या कमकुवत उमेदवाराचा फटका बसण्याच्या भितीने ही खेळी करण्यात आली आहे.