प्रभात वृत्तसेवा पुणे – आदर्श आचारसंहितेचे कोणत्याही परिस्थितीत उल्लंघन होऊ नये, याबाबत सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी विशेष दक्षता घ्यावी. उल्लंघन आढळल्यास तात्काळ कठोर कारवाई करून गुन्हे दाखल करण्याचे स्पष्ट आदेश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी महापालिकेचे विभाग प्रमुख आणि निवडणुकांचे काम पाहणाऱ्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. महापालिका सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, त्याअनुषंगाने पुणे महापालिकेने निवडणूक तयारीला वेग दिला आहे. आयुक्त नवल किशोर राम यांनी बुधवारी (दि. १७) महापालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत निवडणूक तयारीचा आढावा घेतला. या बैठकीत आचारसंहितेची योग्य अंमलबजावणी करावी, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. आयुक्त म्हणाले, की शहरातील अनधिकृत फलक, बॅनर्स, पोस्टर्स व अतिक्रमणांवर त्वरित कारवाई करून शहर स्वच्छ व नीटनेटके ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मतदान केंद्रांची पाहणी करून आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले. विशेषतः दिव्यांग, महिला व ज्येष्ठ नागरिकांना मतदान सुलभ व्हावे, यासाठी मतदान केंद्रे शक्यतो तळमजल्यावर स्थापन करण्यास प्राधान्य देण्यास सांगण्यात आले. उमेदवारांना निवडणूक प्रक्रियेबाबत आवश्यक माहिती व नमुने वेळेत उपलब्ध करून देण्याबाबतही सूचना देण्यात आल्या. दि. २३ डिसेंबर २०२५ पासून छापील नामनिर्देशन पत्रांचे वितरण व स्वीकार प्रक्रिया सुरू होणार असल्याने, २० डिसेंबरपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी यांची कार्यालये तात्काळ कार्यान्वित करण्याचे आदेश देण्यात आले. याशिवाय निवडणूक प्रक्रिया संवेदनशील असल्याने कोणतीही अडचण किंवा समस्या उद्भवल्यास ती तात्काळ शहर निवडणूक अधिकारी तथा महापालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.