PMC Abhay Yojana – महापालिका प्रशासनाकडून मिळकतकर अभय योजनेस अखेर महिन्याभराची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आता थकबाकीदारांना १५ मार्चपर्यंत थकबाकी भरता येणार आहे. ही तिसरी मुदतवाढ आहे. महापालिकेच्या मिळकतकराची थकबाकी १३ हजार कोटींच्यावर गेल्याने, तसेच दरवर्षी ही थकबाकी वाढतच असल्याने महापालिकेकडून मूळ थकबाकीवर आकारण्यात आलेल्या दंडाच्या रकमेत या योजनेत ७५ टक्के सूट देण्यात आली होती. ही योजना सुरुवातीला १५ नोव्हेंबर ते १५ जानेवारी या कालावधीसाठी प्रस्तावित करण्यात आली होती. मात्र, त्यात, प्रशासनास अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने या योजनेस महापालिका आयुक्तांनी या अभय योजनेस १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, शुक्रवारी झालेल्या मुख्य सभेत महापालिकेने पुणेकरांवर करवाढ न करता प्रशासनाने अभय योजनेस मुदतवाढ दिल्यास उत्पन्नात वाढ होणार असल्याने मुदतवाढ देण्याची मागणी काँग्रेसचे नगरसेवक अविनाश साळवे, राष्ट्रवादीचे नगरसेवक बाबूराव चांदेरे यांनी सभागृहात केली. दरम्यान, सभागृह नेते गणेश बिडकर यांनी १५ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी आयुक्तांकडे केली असून, प्रशासनाशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले. त्यानंतर महापालिका आयुक्तांनी शुक्रवारी रात्री उशिरा याबाबतचे आदेश काढले आहेत.अभय योजनेअंतर्गत १३ फेब्रुवारीपर्यंत सुमारे १ लाख ३५ हजारांहून अधिक मिळकतधारकांनी या योजनेचा लाभ घेतला असून, तब्बल ८०१ कोटी रुपयांपेक्षा अधिक महसूल महापालिकेला प्राप्त झाला आहे.