प्रभात वृत्तसेवा पुणे – आज (गुरुवार) पासून २४ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला (पिफ) सुरुवात होत आहे. या वेळी पुणेकरांना केन्स, व्हेनिस, बर्लिन, लोकॉर्नो इत्यादी चित्रपट महोत्सवांत प्रदर्शित झालेल्या सिनेमांचा आस्वाद घेता येणार आहे. १५ ते २२ जानेवारी अशा आठ दिवस चालणाऱ्या या महोत्सवात १० ठिकाणी १४० चित्रपटांचे प्रदर्शन होणार आहे.महोत्सवाची सुरुवात ला ग्राझिया या इटॅलियन सिनेमाने होणार आहे, तर अमेरिकेच्या फादर, मदर, सिस्टर ब्रदर या सिनेमाने महोत्सवाची सांगता होईल. या वेळी सिनेमा क्षेत्रातील अनेक ज्येष्ठ कलाकारांना सन्मानित करण्यात येणार आहे. यात बिस्वजीत चॅटर्जी, फारिदा जलाल, आशा काळे, यांना महाराष्ट्र सरकारच्या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे, तर अमर हल्दीपूर यांना एसडी बर्मन आंतरराष्ट्रीय संगीत पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. या वेळीच्या चित्रपट स्पर्धेत ७ मराठी चित्रपटांचा समावेश आहे. ऑस्कर नामांकन मिळालेले ९ चित्रपट पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. या वेळीच्या विजय तेंडुलकर स्मरणार्थ व्याख्यानात स्वतंत्र सिनेमा, युरोपीयन सिनेमा आणि स्थानिक चित्रपटनिर्मितीवर अनेक सत्रांचे आयोजन केले आहे.