प्रभात वृत्तसेवा पुणे – न्यायालयातील प्रलंबित दावे, तसेच दाखलपूर्व प्रकरणे दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने निकाली काढण्यासाठी येत्या शनिवारी (दि. १३) जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन केले आहे. अधिकाधिक प्रकरणे लोकअदालतीमध्ये तडजोडीसाठी ठेवावी, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन यांनी केले आहे. जिल्हा मुख्यालयासह सर्व तालुक्यातील न्यायालयांत लोकअदालतीचे आयोजन होणार आहे. यामध्ये दोन्ही पक्षकारांनी परस्पर सहमतीने तडजोड केल्याने प्रकरणे जलदगतीने निकाली निघण्यास मदत होते. तसेच, वेळ व पैसा दोघांचीही बचत होते. त्यामुळे जास्तीत जास्त प्रकरणे तोडजोडीसाठी ठेऊन दावे निकाली काढावे, असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव रेवती देशपांडे यांनी सांगितले. अधिक माहितीकरिता जिल्हा व सत्र न्यायालय, शिवाजीनगर, पुणे येथील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसेच बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, वडगाव मावळ, खेड-राजगुरूनगर, आंबेगाव-घोडेगाव, जुन्नर, पुरंदर-सासवड आणि भोर येथील तालुका विधी सेवा समितीशी संपर्क साधावा, असेही देशपांडे यांनी सांगितले.