प्रभात वृत्तसेवा पुणे – शहर फ्लेक्स मुक्त करण्याचा शब्द आम्ही पुणेकरांना दिला असून, नवनिर्वाचित नगरसेवकांचे जे फ्लेक्स पुण्यात लागले आहेत, त्या काढण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांना केल्याचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. पुणे श्रमिक पत्रकार संघात आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमात मोहोळ बोलत होते. या वेळी पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील, सरचिटणीस मंगेश फल्ले, खजिनदार दिलीप तायडे उपस्थित होते. महापालिकेचे मोठे प्रकल्प पूर्ण करण्यास प्राधान्य दिले जाणार असल्याचेही मोहोळ यांनी या वेळी नमूद केले.महापालिका निवडणुकीच्या जाहीरनाम्यात भाजपने शहरातील रस्ते आणि पदपथ अतिक्रमण मुक्त करण्यासोबतच विद्रुपीकरण थांबवण्यासाठी फ्लेक्स मुक्त पुण्याचे आश्वासन दिले आहे. याशिवाय मुख्यमंत्र्यांनीही जाहीर मुलाखतीत कार्यकर्त्यांना याबाबत आवाहन केले होते. असे असतानाही शहरभर अभिनंदनाचे फ्लेक्स लागलेच. यावरून विरोधकांनी टीका सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर मोहोळ यांनी अनधिकृत फ्लेक्स तातडीने काढण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांना केल्याचे सांगितले. मात्र, ते कधीपर्यंत काढणार, याचे उत्तर मात्र ते देऊ शकले नाहीत. निवडणुकीमध्ये विरोधकांनी स्तर सोडून आणि व्यक्तिगत टीका करून नकारात्मक राजकारण केले. आम्ही मात्र, तसे न करता केवळ विकासावर बोललो, असा दावा मोहोळ यांनी केला. शहराच्या भविष्य, विकासाची दिशा आणि कामाचे स्वरूप पाहूनच मतदार कुणाला मत द्यायचे, याचा निर्णय घेतात. त्यांना टीका टिप्पणीशी काहीही देणे घेणे नसते. त्यामुळे आम्ही जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सुद्धा टीका टिप्पणी न करता केवळ विकासावर बोलणार आहोत, असे मोहोळ म्हणाले.महापालिकेतील महत्त्वाची पदे मुख्य शहरातील नगरसेवकांना दिल्यास समाविष्ट गावे आणि उपनगरांतील कामांकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे, याबाबत विचारले असता मोहोळ म्हणाले, की असे होणार नाही. शहराच्या सर्वांगीण विकासाचा अजेंडा डोळ्यांसमोर ठेवूनच काम केले जाणार आहे. स्वीकृतबाबत वरिष्ठांचा निर्णय महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदे सेनेसोबत युती नव्हती. त्यामुळे त्यांना स्वीकृत नगरसेवकपद देण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, असे स्पष्ट करतानाच स्वीकृत नगरसेवक पदे देताना ज्यांना संधी मिळाली नाही, त्यांचा विचार होऊ शकतो. मात्र, याबाबत वरिष्ठच निर्णय घेणार आहेत, असेही मोहोळ यांनी स्पष्टपणे सांगितले.