प्रभात वृत्तसेवा पुणे – येरवडा भागातील शांतिनगर परिसरात मुळा नदीपात्रात गेल्या चार ते पाच वर्षांत तब्बल लाखो टन राडारोडा टाकण्यात आला आहे. परिणामी पावसाळ्यात मुळा नदीत मुळशी धरणातून पाणी सोडल्यानंतर शांतिनगर परिसरात पूरस्थिती उद्भावून या भागातील अनेक घरे दरवर्षी पाण्याखाली जातात. हे राडारोडा टाकण्याचे प्रकार सुरूच असल्याची गंभीर दखल महापालिका आयुक्तांनी घेतली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र समिती नेमून दोषींवर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिले आहेत. याशिवाय संपूर्ण शहरासाठी पथके नेमून दंडात्मक कारवाई करणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. प्रभाग क्रमांक २ (फुलेनगर, नागपूर चाळ) येथील विविध नागरी समस्यांबाबत आयुक्तांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह पाहणी केली. माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे महापालिकेच्या पथ विभागाचे प्रमुख आणि रस्ते विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर, प्रकल्प विभागप्रमुख दिनकर गोजारे, परिमंडळ उपायुक्त माधव जगताप, येरवडा क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त राजेश गुर्रम यांच्यासह मंगेश गोळे, माजी नगरसेवक अशोक कांबळे, भगवान जाधव, माजी नगरसेविका नंदा कांबळे या वेळी उपस्थित होते. या वेळी आयुक्त म्हणाले, की नदीपात्रात राजरोसपणे राडारोडा टाकला असल्याने पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे नदीपात्रही अकुंचित होत असल्याचे आयुक्तांनी सांगितले. या प्रकरणाची सखोल तपासणी करण्यासाठी उपायुक्तांसह तीन ते चार सदस्यीय समिती नेमली जाईल आणि अहवालानुसार दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. या वेळी आयुक्तांकडून या परिसरातील चौक, रस्ते आणि सार्वजनिक सुविधांची पाहणी केली. डॉ. आंबेडकर चौकाचे सुशोभीकरण करण्यासाठी आराखडा तयार करणे, स्वच्छतागृहाचे स्थलांतर करणे, कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावणे, विकास आराखड्यातील रस्त्यांच्या भूसंपादनासाठी पाठपुरावा करणे, तसेच चंद्रमानगर येथील घरांसाठी जागा हस्तांतरासंदर्भात राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.