MSRTC New Bus – राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यात लवकरच नव्या बस दाखल होत आहेत. या बस ३ बाय २ आसन रचनेच्या तब्बल ५५ आसनी अत्याधुनिक बस खरेदी केल्या आहेत. या नव्या बसला हिंदवी स्वराज्याची जननी असलेल्या राजमाता जिजाऊ यांचे नाव दिल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. या नव्या बस राजमाता जिजाऊ नावाने ओळखल्या जातील. या बस मार्च महिन्यापासून टप्याटप्याने राज्यात प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असून, भगव्या आणि शुभ्र पांढऱ्या रंगसंगतीत सजलेल्या या बस महाराष्ट्राच्या परंपरेचे, अभिमानाचे चालते-बोलते प्रतीक ठरणार आहेत. याबाबत सरनाईक म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्रचे दैवत आहेत. त्यांच्या स्वराज्य संकल्पनेमागे उभी राहिलेली प्रेरणाशक्ती म्हणजे राजमाता जिजाऊ साहेब. त्या अर्थाने त्या हिंदवी स्वराज्याच्या जननी ठरतात. म्हणून त्यांच्या स्मरणार्थ एसटीच्या नवीन बसचे राजमाता जिजाऊ असे नामकरण केले आहे. एसटीने यापूर्वी शिवनेरी, शिवशाही, शिवाई, यशवंती, हिरकणी अशा नावांनी बसना यापूर्वी गौरवले आहे. आता त्या परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे सध्या मार्गावर धावत असलेल्या बसची आसन क्षमता ४० प्रवासी इतकी आहे. नव्याने दाखल होणाऱ्या बसची आसनक्षमता ५५ इतकी आहे. त्यामुळे गर्दीच्या मार्गावर उभे राहणाऱ्या १५ प्रवाशांना आता बसण्याची व्यवस्था उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ही सेवा विशेषतः दोन शहरांदरम्यानच्या अतिगर्दीच्या मार्गावर सुरू करण्याचा एसटीचा मानस आहे, असे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.