Maharashtra Sahitya Parishad – महाराष्ट्र साहित्य परिषद निवडणुकीसाठी साहित्य संवर्धन आघाडीने sahityasa.com ही विशेष वेबसाइट विकसित केली आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये सुमारे १६ हजार आजीव सभासद असून मागील ११ वर्षांपासून त्यांची यादी अद्ययावत करण्यात आली नव्हती,अशी माहिती आघाडीचे उमेदवार प्रसाद मिरासदार आणि सुनील महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कुणाल ओंबसे उपस्थित होते.या वेबसाइटवर साहित्य संवर्धन आघाडीचे स्वतंत्र पेज असून त्यामध्ये रेकॉर्ड कॉलमद्वारे पिनकोड, नाव किंवा मोबाइल क्रमांक टाकून आजीव सभासदांना आपला मतदार क्रमांक, पत्ता आणि इतर माहिती तात्काळ पाहता येणार आहे, असे मिरासदार यांनी सांगितले. या सॉफ्टवेअरमध्ये आडनावानुसार मतदार यादी तयार करण्यात आली आहे. त्यामध्ये मतदार यादी क्रमांक तसेच पत्त्याची तपासणीही करता येणार आहे. अनेक सभासदांना आजीव सदस्य कोण आहेत याचीही माहिती नसते, मात्र या वेबसाइटमुळे ती माहिती आता सहज उपलब्ध होणार आहे. तसेच, निवडणुकीत उभ्या असलेल्या सर्व उमेदवारांची सविस्तर माहितीही याठिकाणी पाहता येणार आहे, असे यावेळी सांगण्यात आले. अनेक साहित्यिकांचे पत्ते बदलले, काहींचे निधन झाले, तरीही यादी अद्ययावत करण्यात आलेली नाही. ही यादी नीटनेटकी आणि अद्ययावत करण्याचे काम साहित्य संवर्धन आघाडी करणार असल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले.