प्रभात वृत्तसेवा पुणे – उच्च रक्तदाबामुळे २२ वर्षीय मुलाच्या दोन्ही किडन्या खराब झाल्या. पोटच्या मुलाचा त्रास पाहून त्या आईने किडनी दान करून मुलाला पुर्नजन्म दिला आहे. ससून रुग्णालयातील किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञांच्या टीमने ही प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी केली.पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेत असलेल्या २२ वर्षीय मुलाला जानेवारी २०२३ मध्ये उच्च रक्तदाबामुळे दोन्ही किडन्या खराब झाल्याचे निदान झाले. त्यामुळे किडनी प्रत्यारोपणाशिवाय पर्याय नसल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. मात्र, मुलाच्या कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती हालाकीची, त्यामुळे खासगी रुग्णालयात उपचार घेणे अवघड झाले. तर मागील दोन वर्षांपासून मुलाचे डायलिसिस सुरू होते. ससून रुग्णालयात किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होत असल्याचे रुग्णाच्या नातेवाइकांना समजल्यावर त्यांनी ससूनमध्ये चौकशी केली. त्यावेळी समाजसेवा अधीक्षक सत्यवान सुरवसे आणि अरुण बनसोडे यांनी सर्व माहिती देत घरातील व्यक्तीला किडनीदान करता येईल, असे समुपदेशन केले. त्यावेळी मुलाच्या भविष्यासाठी आईने किडनी दान करण्यास तयार दर्शवली.त्यानुसार किडनीरोग तज्ज्ञ डॉ. संदीप मोरखंडिकर आणि डॉ. निरंजन आंबेकर यांच्या सल्ल्यानुसार, आईची किडनीदान घेण्याचे निश्चित झाले. मानवी अवयव प्रत्यरोपण कायद्यानुसार ट्रान्सप्लांटच्या सर्व कायदेशीर मान्यतेचा संपूर्ण प्रस्ताव समाजसेवा अधीक्षक यांनी तयार करून तो प्रस्ताव विभागीय मानवी अवयव प्राधिकार समिती समोर सादर केला. विभागीय मानवी अवयव प्रत्यरोपण प्राधिकार समितीने पूर्ण प्रस्ताव व सर्वांच्या मुलाखती घेतल्या त्यानंतर सदर प्रत्यरोपण करण्यास मान्यता दिली. त्यानंतर अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. यल्लपा जाधव आणि शल्यचिकित्साशास्त्र विभाग प्रमुख डॉ. लता भोईर आणि मानवी अवयव प्रत्यारोपण कार्यक्रम प्रमुख डॉ. किरणकुमार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मेडिसिन विभागाचे विभागप्रमुख डॉ. हरिदास प्रसाद, डॉ. हर्षल भितकर, डॉ. निरंजन आंबेकर, डॉ. संदीप मोरखंडीकर, डॉ. सुरेश पाटणकर, डॉ. राजेश श्रोत्री, डॉ. हर्षद तोष्णीवाल, डॉ. विवेक बारेकर, वास्कुलर सर्जन डॉ. शार्दूल दाते, डॉ. सुरेखा शिंदे, डॉ. सुजित क्षीरसागर आदी टीमने किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली.