प्रभात वृत्तसेवा पुणे – शिक्षक व शिक्षकेतर संघटना समन्वय समितीतर्फे शुक्रवारी (दि. ५) बंद आंदोलन करण्यात येणार आहे. शाळा बंद ठेवल्यास अनुदानित शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्यात येमार असल्याचे आदेश माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिले आहेत. टीईटी संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर पुनर्विचार याचिका दाखल करावी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, शिक्षण सेवक योजना रद्द करून नियमित वेतनश्रेणी लागू करावी, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया सुरू करावी आदी प्रलंबित मागण्यासाठी शाळा शुक्रवारी (दि. ५) बंद करून जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चा काढला जाणार आहे. खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित, विनाअनुदानित शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आंदोलनात सहभागी झाल्यास वेतन कपातीची कारवाई करण्यात येणार आहे.विद्यार्थी हित लक्षात घेऊन कोणतीही शाळा बंद राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.