प्रभात वृत्तसेवा पुणे – मध्य महाराष्ट्र आणि विदर्भासह आता मराठवाड्यातील थंडीचा पारा घसरला असून, येथील काही जिल्ह्यात थंडीची लाट आली आहे. गेल्या दोन दिवसांत मध्य महाराष्ट्र गारठला असून, अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वांत कमी ७.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. त्यापाठोपाठ जळगाव, मालेगाव, नाशिक यासह गोंदिया, नागपूर, यवतमाळ आणि वर्धा हे जिल्हे कडाक्याच्या थंडीने गारठले आहेत. हवामानातील बदलामुळे मागील आठ दिवसांपासून राज्यातील थंडीचा जोर कमी झाला असून, १४ ते १५ अंशांवर असलेल्या किमान तापमानात लक्षणीय घट झाल्यामुळे मागील ४८ तासांत थंडीचा पारा ७ अंशांपर्यंत खाली आला आहे. विदर्भासह मराठवाड्यातही किमान तापमानात घट झाल्यामुळे हुडहुडी भरणाऱ्या थंडीने जिल्हे गारठले आहेत. मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर, पुणे, जळगाव, मालेगावा, नाशिक यासह विदर्भातील नागपूर, गोंदिया, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांसह मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील किमान तापमान ९ अंशांच्या खाली नोंदविले आहे. परिणामी या जिल्ह्यात थंडीची लाट आली असून, कडाक्याची थंडी जाणवत आहे. पहाटे धुक्याचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान, पुढील दोन दिवसांत राज्यातील हवामान कोरडे आणि आकाश निरभ्र राहील. किमान तापमानात एक ते दोन अंशाने घट होण्याची शक्यता असून, काही जिल्ह्यांत थंडीची लाट येईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यातील किमान तापमान अहिल्यानगर ७.५, जळगाव आणि नागपूर ८, नाशिक ८.१, पुणे आणि गोंदिया ८.४, यवतमाळ ८.८, बीड ९, मालेगाव ९.४, वर्धा ९.५, परभणी १०.५, छत्रपती संभाजीनगर आणि अकोला १०.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.