प्रभात वृत्तसेवा पुणे : पाचशे चौरस फुटांपेक्षा कमी आकाराचे घर असणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकातील कुटुंबांना शून्य मालमत्ता कर, वारसा स्थळ परिसरातील जुन्या वास्तूंच्या पुनर्विकास, ७५ वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांना मोफत पीएमपी आणि महिलांना मेट्रो-पीएमपी प्रवासात सवलत देण्याचा संकल्प भारतीय जनता पार्टीने केला असल्याची माहिती भाजपच्या नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिसाळ यांच्याशी ‘प्रभात’ने संवाद साधला. त्यावेळी त्या बोलत होत्या.पुण्याची जीवनशैली सर्व समाज घटकांसाठी सुखदायी असावी. गृहिणी, विद्यार्थिनी, नोकरदारांसाठी पुणे सुरक्षित असले पाहिजे. मुले, तरुणांना खेळण्यासाठी मैदाने हवीत. ज्येष्ठांसाठी आरोग्य आणि मनोरंजनाच्या सुविधा असल्या पाहिजेत. यादृष्टीने नियोजनबद्ध काम करण्याचा निर्धार भाजपाने केला असल्याचे मिसाळ म्हणाल्या. त्या म्हणाल्या, की पूर्ण करता येतील अशीच आश्वासने भाजपा देत आहे. निवडणुकीच्या तोंडावर अशक्य आश्वासने देऊन नंतर पुणेकरांची फसवणूक आमचा पक्ष करणार नाही. पुणे हे मूलतः मध्यमवर्गीय, कष्टकरी, नोकरदार, कामगारांचं शहर आहे. या समाजघटकांचे जीवनमान उंचावण्यास आमचे प्राधान्य आहे. या दृष्टीने महापालिकेच्या ३२० प्राथमिक शाळा आणि ४३ माध्यमिक शाळांमध्ये अत्याधुनिक शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. दिव्यांग बंधू-भगिनींना पीएमपीएमएल प्रमाणेच मेट्रो प्रवासातही सवलत देणार आहोत. फेरीवाल्यांसाठी निर्धारित जागांची निर्मिती केली जाईल. प्रचारासाठी नागरिकांमध्ये गेल्यानंतर भाजपाच्या पहिल्या टर्मबद्दल अतिशय समाधान व्यक्त होत असल्याचे जाणवले असे सांगून त्या म्हणाल्या, २०१७ मध्ये भाजपाला पहिल्यांदाच महापालिकेची सत्ता मिळाली. या कार्यकालात भाजपाने सर्वांसाठी कल्याणकारी योजना राबविल्या. त्यामुळे मतदार भाजपाच्या कामगिरीवर समाधान व्यक्त करत आहेत. यंदाही भाजपालाच संधी देण्याचा आमचा निर्णय झाल्याने पुणेकर आवर्जून सांगत आहेत. “ज्येष्ठांसाठी नियमित मोफत आरोग्य तपासणी शिबिर, पाईपद्वारे घरोघरी गॅस, आर्थिक दुर्बल तरुणांना मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम, सार्वजनिक स्वच्छतागृहांची वाढीव संख्या, तरुणांच्या आरोग्यासाठी वॉकिंग-सायकलिंग-जॉगिंग ट्रॅकची निर्मिती, कर्करोगासारख्या गंभीर आजारासाठी आर्थिक दुर्बलांना वैद्यकीय साहाय्य असे प्रत्येक घटकाच्या हिताचे निर्णय राबविण्यावर भाजपाचा भर असेल.” – माधुरी मिसाळ, राज्यमंत्री