प्रभात वृत्तसेवा पुणे – मुळशी परिसरात कुंपणाच्या तारेत अडकलेल्या बिबट्याची रविवारी सकाळी सुखरूप सुटका करून त्याला पुण्यातील रेस्क्यू वन्यजीव ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये हलविण्यात आले. सध्या बिबट्याची सखोल वैद्यकीय तपासणी आणि आवश्यक उपचार करण्यात येणार आहेत.रविवारी सकाळी सुमारे ११ वाजता कुंपणात बिबट्या अडकल्याची माहिती माहिती वन विभागाला मिळाली. त्यानंतर वन विभागाने रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टच्या पथकाला तात्काळ कळवले आणि तीन मिनिटांतच हे पथक घटनास्थळी निघाले. रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टचे वन्यजीव पशुवैद्य डॉ. सात्विक पाठक यांनी बिबट्याला सुरक्षितपणे बेशुद्ध केले. त्यानंतर त्याला पिंजऱ्यात सुरक्षित ठेवून बावधन, पुणे येथील वन्यजीव ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये हलविण्यात आले. माहिती मिळाल्यापासून ते बिबट्याला बेशुद्ध करून पिंजऱ्यात सुरक्षित करण्यापर्यंत संपूर्ण बचाव कार्य अवघ्या दीड तासांत पूर्ण करण्यात आल्याचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांनी सांगितले. बिबट्या कुंपणाच्या तारेत अडकलेला असल्याने प्राणी, तसेच बचाव पथकासाठीही धोका निर्माण झाला होता. पायी जाऊन परिस्थिती तपासणे धोकादायक ठरू शकले असते. कारण बिबट्या अचानक हल्ला करू शकत होता. त्यामुळे वाहनातूनच सुरक्षित पद्धतीने त्याला बेशुद्ध करण्यात आले. आता त्याची प्रकृती स्थिर आहे, असे रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टचे वन्यजीव पशुवैद्य डॉ. सात्विक पाठक यांनी सांगितले.या बचाव कार्यात स्थानिक नागरिकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. स्थानिक गावकऱ्यांनी शांतता राखून पूर्ण सहकार्य केल्यामुळे कोणताही गोंधळ किंवा अडथळा न होता बचाव कार्य जलद आणि सुरळीत पार पडले, तसेच पथकांना प्राण्याच्या सुरक्षिततेवर पूर्ण लक्ष केंद्रित करता आल्याचे रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापक, अध्यक्ष नेहा पंचमिया यांनी सांगितले.