प्रभात वृत्तसेवा पुणे – नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत (एनटीए) २०२६ पासून जेईई, नीट प्रवेश परीक्षांमध्ये बायोमेट्रिक हजेरीचा वापर होणार आहे. या परीक्षांमध्ये चेहरा ओळख तंत्रज्ञानाचे वापर करण्याचे नियोजन एनटीएमार्फत सुरू असून यासाठी उमेदवारांनाही अर्ज भरताना योग्य प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता वाढवणे, फसवणुकीसारखे गैरप्रकार थांबवण्यासाठी ही प्रणाली अवलंबली आहे. या नियमानुसार, उमेदवारांना अर्जावेळी लाइव्ह फोटो अपलोड करावा लागेल. अर्जदाराची यामुळे खातरजमा होईल. तसेच फसवणुकीला आळा बसेल. केंद्राने स्थापन केलेल्या राधाकृष्णन समितीच्या शिफारशींनुसार हा बदल केला आहे. याची एनटीएने प्रायोगिक तत्त्वावर चाचणीही घेतली आहे. त्यानंतरच याची अमलबजावणी होत आहे. दिल्लीतील काही परीक्षा केंद्रांवर फेस रेकग्निशन ऑथेंटिकेशन (चेहरा ओळख चाचणी) करण्यात आले. हा प्रयोग यूआयडीएआय, एनआयसी आणि एनटीएच्या संयुक्त प्रयत्नातून करण्यात आला. हा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे एनटीएने २०२६ पासून देशात प्रमुख प्रवेश परीक्षांमध्ये ही प्रणाली लागू करण्याचे ठरविले आहे. बायोमेट्रिक तंत्रज्ञानामध्ये, उमेदवाराच्या चेहऱ्याच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून केला जातो. परीक्षा केंद्रात प्रवेश करण्यापूर्वी, उमेदवाराची ओळख थेट चेहरा स्कॅन करून तपासली जाते. गेल्या काही वर्षांत नीट, जेईई यासारख्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांमध्येही गैरप्रकार समोर आले होते. यामुळे उमेदवाराची ओळख पटविण्यासाठी हा प्रयोग महत्त्वाचा ठरणार आहे.