पुणे (ज्ञानेश्वर फड): ‘ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील जयकर ग्रंथालयात अभ्यास करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा रविवारी (दि. 30 नोव्हेंबर 2025) विद्यापीठ परिसरात उत्साहात पार पडला. या मेळाव्यात १३० हून अधिक जयकर ग्रंथालयात अभ्यास केलेले प्रशासकीय सेवेतील अधिकारी, विविध क्षेत्रात कार्यरत असलेले मित्रांनी एकत्र येऊन विद्यापीठात घालवलेल्या संघर्षाच्या दिवसांच्या आठवणी जागवल्या. विद्यापीठातील मुख्य जयकर ग्रंथालयासोबतच रात्री उशिरापर्यंत अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या हाॅस्टेल परिसरातील ‘मिनी जयकर’ (हनुमान जयकर)च्या आठवणी सांगताना अनेकांना गहिवरून आले. साध्या टेबल-खुर्च्या, अल्प सुविधा, पण जिद्द आणि मेहनतीच्या बळावर अनेक अधिकारी घडवणाऱ्या या ठिकाणाची माजी विद्यार्थ्यांनी आठवण काढत गेल्या अनेक वर्षांचा संघर्षमय प्रवास सांगितला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यातील कष्ट, आर्थिक अडचणी आणि अनेक वर्षे अखंड अभ्यास करून साध्य केलेले यश याबद्दल अनुभव मांडले. स्नेहसंमेलनानंतर स्नेहभोजन आणि मुख्य इमारत, विद्यापीठ परिसरात फेरफटका मारण्यात आला. प्रशासकीय सेवा, पोलीस विभाग, महसूल, सहकार, शिक्षण, सामाजिक, राजकीय, व्यावसायिक अशा सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी एकत्र येऊन आनंद व्यक्त केला. “विद्यापीठातील संघर्षाच्या दिवसांची आठवण आज पुन्हा जागी झाली. परिस्थितीवर मात करून अधिकारी झालेले सर्व सहअभ्यासक एका ठिकाणी भेटल्यामुळे मन भारावले. आजचा दिवस सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला,” असे मनोगत माजी विद्यार्थांनी व्यक्त केले. स्नेहमेळाव्याचे हे दुसरे वर्ष होते. यापुढे दरवर्षी स्नेहमेळावा आयोजित करण्याचा मानस सर्वांनी व्यक्त केला.