प्रभात वृत्तसेवा पुणे – विमान उड्डाणांच्या नियोजनातील गोंधळाचा फटका प्रवाशांना बसला असून, त्यांना मनस्तापही सहन करावा लागला. त्यामुळे या प्रवाशांना कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क न आकारता त्यांच्या तिकिटाचे पैसे तातडीने परत करा. तसेच, प्रवाशांचे राहिलेले सर्व साहित्य (बॅगेज) ४८ तासांच्या आत परत करा, असे निर्देश ‘इंडिगो’ कंपनीला देण्यात आल्याची माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रवाशांनी तिकिटे आरक्षित करताना वापरलेल्या पेमेंट पद्धतीच्या मूळ खात्यामध्ये हा परतावा जमा केला जाणार असल्याचे सांगत मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चार सदस्यांची समिती नेमण्यात आली असून, त्यांच्या अहवालानंतर पुढील कारवाई केली जाईल. मागील काही दिवसांत इंडिगो विमानांची नियोजित जवळपास ९० टक्के उड्डाणे रद्द झाली. मात्र, सध्या ५७ पैकी ३७-४८ उड्डाणे पुन्हा सुरू होत आहेत. स्थिती हळूहळू पूर्ववत होत आहे. तसेच, इतर विमान कंपन्यांनी वाढविलेल्या तिकीट दरांवर नियंत्रण आणले असून, प्रवाशांचे आर्थिक नुकसान होऊ नये, याची सर्वतोपरी काळजी घेण्यात आली आहे. स्थिती त्वरित सुधारण्यासाठी ‘फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन’ (FDTL) काही काळासाठी स्थगित करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. दरम्यान, नागपूर अधिवेशनासाठी निघालेल्या काही आमदारांची तिकीटे रद्द झाल्याची माहिती मिळाली. त्यामुळे काही आमदार रस्त्याने तर काहीजण एअर इंडिया किंवा स्पाईसजेटने जात आहेत. काहीजण एकत्र येऊन चार्टर फ्लाईट काढण्याचाही विचार करीत आहेत. राज्यातील प्रत्येक भागातील आमदारांना नागपूरला पोहोचणे महत्त्वाचे आहे, असेही मोहोळ यांनी सांगितले. “पुणे विमानतळावर इंडिगोने आठ विमाने पार्क करून अडथळा निर्माण केल्याच्या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली असून, ती विमाने ताबडतोब हटविण्याचे निर्देश दिले आहेत. चौकशी पूर्ण झाल्यानंतर कठोर कारवाई केली जाईल. विमानतळ लष्कराचा हवाई तळ असला तरी, या प्रकारामुळे एअरस्पेसवर कोणताही परिणाम झाला नाही.” – मुरलीधर मोहोळ, केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री